सांगली: बिबट्याच्या हल्ल्यात बालक जखमी, उपचारासाठी वन्यजीव विभागाकडून तात्काळ मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 05:08 PM2022-10-21T17:08:32+5:302022-10-21T17:29:17+5:30
पुढील उपचारासाठीही मदत करणार असल्याचे केले जाहीर
गंगाराम पाटील
वारणावती : उखळू ता. शाहूवाडी येथील नऊ वर्षीय श्रेयश प्रकाश वडाम हा शाळकरी बालक बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे दाखल करण्यात आले आहे. या जखमी बालकास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वन्यजीव विभागाकडून उपचारासाठी तात्काळ मदत म्हणून पंचवीस हजार रूपयांचा धनादेश कुटुंबियांना सुपूर्त केला.
काल, गुरुवारी (दि.२०) सायंकाळच्या सुमारास श्रेयस घराच्या पाठीमागे पाण्याच्या टाकीजवळ शौचालयास गेला असता बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात त्याच्या संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा झाल्या. रक्तबंबाळ अवस्थेत श्रेयशला कृष्णा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत वन्यजीव विभागाशी संपर्क साधला असता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी श्रेयसच्या तब्बेतीची विचारपूस केली. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी सांगितले.
यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पचे क्षेत्र संचालक नानासाहेब लडकत यांच्या हस्ते उपचारासाठी तात्काळ मदत म्हणून पंचवीस हजार रूपयांचा धनादेश कुटुंबियांना देण्यात आला. तर, पुढील उपचारासाठी मदत करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. दरम्यान, वनक्षेत्रपाल नलवडे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले.