वाघमारेवाडीत शेळीवर बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 06:45 PM2017-10-13T18:45:36+5:302017-10-13T18:48:57+5:30
येळापूर-वाघमारेवाडी (ता. शिराळा) येथील लक्ष्मण वडकर यांच्या शेळीवर बुधवार, दि. ११ रोजी बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने शेळीला जबर जखमी केले आहे. बिबट्याने प्राण्यावर हल्ला करण्याची आठवड्यातील ही तिसरी घटना असल्याने शेतकऱ्यानी डोंगरात जाणेच बंद केले आहे.
कोकरुड , दि. १३ : येळापूर-वाघमारेवाडी (ता. शिराळा) येथील लक्ष्मण वडकर यांच्या शेळीवर बुधवार, दि. ११ रोजी बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने शेळीला जबर जखमी केले आहे. बिबट्याने प्राण्यावर हल्ला करण्याची आठवड्यातील ही तिसरी घटना असल्याने शेतकऱ्यानी डोंगरात जाणेच बंद केले आहे.
येळापूर परिसरातील वाघमारेवाडी, जामदारवाडी, चव्हाणवाडी येथील लोक आपल्या म्हैशी, शेळ्या, घेऊन चारण्यास जातात. अनेक वर्षापासून हे सुरु आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून डोंगरावर गेलेल्या जनावरांवर बिबट्याकडून हल्ला होत आहे. आठ दिवसांपूर्वी तानाजी जामदार यांच्या शेळीस बिबट्याने ठार केले होते, तर रविवारी सुभाष वाघमारे यांची शेळी ठार केली.
बुधवार, दि. ११ रोजी लक्ष्मण वडकर यांच्या शेळीवर हल्ला केला. मात्र यावेळी शेळीला वाचविण्यात यश आले असले तरी, मोठ्या जखमा झाल्या असल्याने शेळी वाचण्याची शक्यता कमी आहे.
या परिसरात अशा तीन घटना झाल्यानंतरही वन विभागाचे अधिकारी घटनास्थळाकडे फिरकले नसल्यामुळे शेतकऱ्यामध्ये तीव्र नाराजी आहे. शेतकरी डोंगरात जनावरे चरावयास अथवा चारा आणावयास जाण्यास घाबरत असून या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.