Sangli: चिंचणीत बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 07:17 PM2024-05-23T19:17:53+5:302024-05-23T19:23:25+5:30
नागरिकांत भीतीचे वातावरण
प्रताप महाडीक
कडेगाव : कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथे असलेला बिबट्याचा अधिवास नागरीकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. काल, बुधवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. या घटनेचा थरार सीसीटीव्हीची कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माजी आमदार मोहनराव कदम यांचे स्वीय सहाय्यक सनिथ कदम यांचे चिंचणी हद्दीत वाजेगाव रस्त्यालगत शेतात घर आहे. घराच्या परिसरात काल रात्री बिबट्या आला. कदम यांनी पाळलेल्या कुत्र्याने भुंकण्यास सुरवात केली. मात्र काही क्षणातच बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला.
यावेळी कुत्रा बचाव करण्यासाठी घरापासून धावत वाजेगावच्या दिशेने गेला. या कुत्र्याच्या पाठीमागे बिबट्या धावत गेला. हल्ल्याचा हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. घटनेनंतर कुत्रा पुन्हा माघारी आला नसल्याने बिबट्याने शिकार केली असावी असा अंदाज आहे. बिबट्याच्या दहशतीने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी
चिंचणी परिसरात बिबट्याचा वावर आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना करत बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली.