इस्लामपूरच्या पश्चिम भागात बिबट्याची एन्ट्री; भोजुगडे मळा परिसरात वावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 10:48 PM2022-01-31T22:48:08+5:302022-01-31T22:49:38+5:30
वन विभागाने बिबट्याच्या या वावराला दुजोरा दिला आहे.
इस्लामपूर: शहराच्या पश्चिम भागातील शेती आणि मानवी वस्ती असणाऱ्या परिसरातील बांधकामावर बिबट्या ठाण मांडून बसल्याचे सोमवारी दिसून आले. कुत्र्यांच्या जोरात भुंकण्यामुळे तो पहाटे तेथील एका कुटुंबाने २५-३० फुटांवरून पाहिला. ही घटना रात्री अडीच-पावणेतीनच्या सुमारास घडली. बिबट्याच्या एन्ट्रीने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वन विभागाने बिबट्याच्या या वावराला दुजोरा दिला आहे.
कोरे आप्पा क्रशरपासून पुढे कुरळपकर कॉलनीतून विठ्ठलवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भोजुगडे मळा आहे. याच परिसरात अभिनंदन पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. पाटील तिथेच शेजारी भाड्याने घर घेऊन राहिले आहेत. रात्री अडीचच्या सुमारास कुत्र्यांच्या जोरात भुंकण्याचा आवाज आल्यामुळे बांधकामावर कोणी चोरटे आले असतील का, या शंकेने ते उठून बाहेर आले. यावेळी बांधकामावर त्यांना बिबट्या बसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ते रहात असलेल्या दुसऱ्या मजल्यावरून बांधकामावर विजेचा झोत टाकल्यावर बिबट्या उडी मारून शेजारी असणाऱ्या मोकळ्या जागेतून शाळूच्या शेतात गायब झाला. या परिसरात शेती आणि पाण्याचा साठा असल्याने बिबट्या आला असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
घटनेची माहिती मिळताच वनरक्षक अमोल साठे, निवास उगळे, भगवान गायकवाड यांनी या परिसरात भेट दिली. हा बिबट्या चुकून महामार्ग ओलांडून आला असावा. शेती आणि गारवा मिळाल्याने तो या परिसरात थांबला असावा. नागरिकांनी भीती न बाळगता दक्षता बाळगावी. रात्री उशिरा या परिसरात एकट्याने जाऊ अथवा फिरू नये अशा सूचना दिल्याचे साठे यांनी सांगितले.
बिबट्या पूर्ण वाढ झालेला
बांधकाम सुरू असलेल्या परिसरात त्यांना बिबट्याचे ठसे आढळून आले. हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला आणि अंदाजे तीन वर्षे वयाचा असावा अशी माहिती साठे यांनी दिली.