शिराळ्यात बिबट्या-मानव सहजीवन जनजागृती कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:41 AM2020-12-12T04:41:41+5:302020-12-12T04:41:41+5:30
शिराळा : निसर्गसौंदर्याने संपन्न असलेल्या शिराळा तालुक्यात सध्या बऱ्याच ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे. तसेच काही ठिकाणी पाळीव प्राण्यांवर ...
शिराळा : निसर्गसौंदर्याने संपन्न असलेल्या शिराळा तालुक्यात सध्या बऱ्याच ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे. तसेच काही ठिकाणी पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्लेही होत आहेत. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, पर्यावरण संवर्धन विषयावर काम करणाऱ्या प्लॅनेट अर्थ फाैंडेशन व प्रादेशिक वन परिक्षेत्र कार्यालय यांच्यावतीने तालुक्यात विविध गावात बिबट्या जनजागृती कार्यक्रम राबविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
भाटशिरगाव, वाकुर्डे खुर्द (ता. शिराळा) येथे या जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायतीच्या मदतीने करण्यात आली. यावेळी लोकांमध्ये असलेली बिबट्याबद्दलची भीती व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संस्थेच्या अभ्यासानुसार, बिबट्याने ऊसशेतीस आपला अधिवास बनवला आहे. उसातच तो आपले प्रजनन करत आहे. गावातील मोकाट कुत्री, जनावरे, तसेच उसात सापडणारे मोर, वानर, डुक्कर अशा प्राण्यांवर तो आपली गुजराण करत आहे. मनुष्य हे बिबट्याचे अन्न नसल्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. काही ठिकाणी बिबट्याने बकरी, रेडकू, कालवड मारल्याच्याही घटना समोर येत आहेत. त्यासाठी बंदिस्त गोठा बनविणे व आपल्या पाळीव प्राण्यांना बिबट्यापासून सुरक्षित ठेवणे हाच योग्य पर्याय आहे. हे या जनजागृती कार्यक्रमातून शेतकऱ्यांना समजवण्यात येत आहे.
यावेळी शिराळा प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत काळे, वनपाल चंद्रकांत देशमुख, हणमंत पाटील, पी. एन.पाटील, देवकी ताहसीलदार, बाबा गायकवाड, प्लॅनेट अर्थ फौंडेशनचे अध्यक्ष आकाश पाटील, उपाध्यक्ष प्रणव महाजन, सदस्य प्रशांत कुंभार, वैभव नायकवडी, प्रा. सुशीलकुमार गायकवाड, संदीप काळे आदी उपस्थित होते.
फोटो -१११२२०२०-आयएसएलएम-शिराळा न्यूज
फोटो ओळ :
भाटशिरगाव (ता. शिराळा) येथे बिबट्या-मानव सहजीवन जनजागृती कार्यक्रमात प्लॅनेट अर्थ फाैंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
————————-