Sangli: अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, वनविभागाचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 12:33 PM2023-08-16T12:33:12+5:302023-08-16T12:33:50+5:30
बिबट्याला बघण्यासाठी गर्दी
शंकर शिंदे
ऐतवडे बुद्रुक : चिकुर्डे-ऐतवडे खुर्द येथे मुख्य रस्त्यालगत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. आज, बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देवूनही घटनास्थळी कुणीच वेळेत न पोहचल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे घटनास्थळी चर्चा सुरु होती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चिकुर्डे ते ऐतवडे खुर्द मुख्य रस्त्यालगत देवर्डे हद्दीत तीन वर्षाच्या नर जातीच्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला होता. याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाला संपर्क केला. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने बिबट्याने प्राण सोडला. बिबट्याच्या मृत्यूची बातमी परिसरात पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली.
मागील आठ दिवसापासून कुरळप फाटा ते चिकुर्डे रोडवरील दत्तखडी परीसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. वन विभागाला याबाबत वारंवार सूचना देऊनही संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. ऐतवडे खुर्द सह करजंवडे, देवर्डे, चिकुर्डे, कुरळप आदी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मंदिराच्या आसपास बिबट्याचे सातत्याने दर्शन होत आहे.
बुधवारी चार वाजण्याच्या सुमारास एक शेतकरी शेतात काम करत असताना अचानक समोरून बिबट्या आलेल्याने त्यांची धादंल उडाली होती. या परिसरात असणाऱ्या शेतवस्ती वरील कुत्र्यांना बिबट्याने आपले भक्ष केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक कुत्र्यांचा, जनावरांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे ऐतवडे खुर्द ग्रामसभेत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.