नेर्ले परिसरात बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:55 AM2020-12-11T04:55:08+5:302020-12-11T04:55:08+5:30
नेर्ले : नेर्ले ते बहे रस्त्यालगत असणाऱ्या मोडा नावाच्या शेतजमिनी परिसरात मंगळवारी रात्री शेतात जाणाऱ्या दोघांना बिबट्याचे दर्शन ...
नेर्ले : नेर्ले ते बहे रस्त्यालगत असणाऱ्या मोडा नावाच्या शेतजमिनी परिसरात मंगळवारी रात्री शेतात जाणाऱ्या दोघांना बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील शेतकरी अशोक जयसिंग पाटील व त्यांचा मुलगा प्रशांत हे दोघे मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून शेतात पाणी पाजण्यासाठी जात होते. मोडा नावाच्या शेतजमिनीच्या परिसरात ते आले असताना त्यांच्या दुचाकीच्या आडवे एक कुत्रे आले. दुचाकीचा वेग त्यांनी कमी करून पाहिले असता, कुत्र्याच्या मागे बिबट्या लागल्याचे जाणवले. रस्त्याकडेला बिबट्या बसला होता. हे पाहताच त्यांनी दुचाकीचा वेग वाढवला व निघून गेले.
रात्रपाळीला अनेक शेतकरी शेतात पाणी देण्यासाठी रात्रभर शिवारात असतात. गेल्या काही महिन्यांपूर्वी गावाच्या पश्चिमेला बिबट्याचा वावर होता. केदारवाडी फाट्यावर महामार्गावर एक बिबट्या अज्ञात वाहनाने ठोकरल्याने मरण पावला होता. वन विभागाने तातडीने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संजय गांधी निराधार योजनेचे वाळवा तालुका अध्यक्ष संजय पाटील यांनी केली आहे.