सांगलीत राजवाडा चौकात बिबट्याचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:28 AM2021-04-01T04:28:30+5:302021-04-01T04:28:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील मध्यवर्ती राजवाडा चौकाने बुधवारी दिवसभर बिबट्याचा थरार अनुभवला. तेथील पडक्या इमारतीत घुसलेल्या बिबट्याला ...

Leopard trembles in Sangli Rajwada Chowk | सांगलीत राजवाडा चौकात बिबट्याचा थरार

सांगलीत राजवाडा चौकात बिबट्याचा थरार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील मध्यवर्ती राजवाडा चौकाने बुधवारी दिवसभर बिबट्याचा थरार अनुभवला. तेथील पडक्या इमारतीत घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात अखेर १४ तासांनंतर यश आले. सकाळी सव्वासातला आलेल्या बिबट्यास रात्री साडेनऊला शूटरद्वारे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केल्यानंतर पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. त्याला रात्री उशिरा कुपवाडच्या वनविभाग कार्यालयात नेण्यात आले असून, वरिष्ठांंच्या आदेशानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्याबाबत निर्णय होणार आहे.

सकाळी सव्वासातच्या सुमारास राजवाडा चौकातील महापालिकेच्या शॉपिंग काॅम्प्लेक्सशेजारच्या महापालिकेच्या शाळा क्रमांक दहाच्या कौलांवरून बिबट्याने खाली उडी घेत रस्त्यावर प्रवेश केला. सकाळची वेळ असल्याने वर्दळ कमी होती. तेथील चहा विक्रेते नामदेव खामकर यांनी प्रथम त्याला पाहिले. क्षणार्धात बिबट्या रस्ता ओलांडत उडी मारून आयसीआयसीआय बँकेच्या शेजारच्या पडक्या इमारतीला लावलेल्या पत्र्यावरून उडी घेत आतमध्ये घुसला.

शहरात बिबट्या आल्याची माहिती मिळताच पोलीस व वन विभागाचे पथक दाखल झाले. पडक्या इमारतीमध्ये अडगळीत तो लपून बसल्याने पकडण्यात अडचणी येत होत्या. राजवाडा चौक ते पटेल चौक हा रस्ता बंद करण्यात आला. रॉकेल लाईन परिसरातही जमावबंदी करण्यात आली. पोलिसांनी गर्दी करणाऱ्या बघ्यांना पांगवले.

बिबट्या घुसलेल्या संपूर्ण इमारतीला वन विभागाने जाळी लावून घेतली. इमारतीच्या प्रवेशद्वारात पिंजरा ठेवण्यात आला. मात्र, बिबट्या त्यात येत नव्हता. वन विभागाचे कोल्हापूर येथील पथकही दाखल झाले. सकाळी सातपासून दुपारपर्यंत त्याला पकडण्याची मोहीम सुरू होती. वनविभाग, पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुपारी काही वेळेसाठी ऑपरेशन थांबविले. मात्र, तरीही बिबट्या अडगळीतून बाहेर आला नाही.

अखेर रात्री पावणेनऊच्या सुमारास ट्रॅनकोलायझेशन गनच्या माध्यमातून शूटरने बिबट्याला तीन डोस दिले. त्यातील दोन इंजेक्शननी त्याचा वेध घेतला. त्यातील एकाचा परिणाम होऊन साडेनऊच्या सुमारास तो बेशुद्ध झाला आणि त्यास सुरक्षितपणे पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात आले. तब्बल १४ तासांनंतर बिबट्याला पकडण्यात यश आल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला.

दरम्यान, दिवसभर या परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

वन विभागाचे वनसंरक्षक सुहास धानके यांच्यासह वनक्षेत्रपाल बाबूराव शिंदे, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांचे पथक घटनास्थळी ठाण मांडून होते. विविध सामाजिक संघटनांनीही स्वयंस्फूर्तीने प्रशासनाला मदत केली.

चौकट

बिबट्या नक्की आला कोठून?

सांगली शहरात यापूर्वी दोन वेळा गवा, सांबर आदी प्राणी आढळून आले आहेत. बिबट्याने प्रथमच शहरात एंट्री केली आणि तो थेट मध्यवर्ती चौकातच दाखल झाला. तो नेमका कोठून आला याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, गेल्या आठवड्यात पलूस परिसरात आढळलेला बिबट्याच बुधवारी शहरात आल्याची शक्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Web Title: Leopard trembles in Sangli Rajwada Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.