खबरदारी घ्या! चार महिने बिबट्यांचा प्रजनन काळ; ऊसतोड कामगार, शेतकऱ्यांनी जागरूक राहणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 05:54 PM2023-11-28T17:54:30+5:302023-11-28T17:54:50+5:30

बिबट्यांचे याच काळात हल्ले

Leopards breed for four months; Sugarcane workers, farmers need to be aware | खबरदारी घ्या! चार महिने बिबट्यांचा प्रजनन काळ; ऊसतोड कामगार, शेतकऱ्यांनी जागरूक राहणे गरजेचे

खबरदारी घ्या! चार महिने बिबट्यांचा प्रजनन काळ; ऊसतोड कामगार, शेतकऱ्यांनी जागरूक राहणे गरजेचे

विकास शहा

शिराळा : जंगलामध्ये वन्य प्राण्यांना पुरेसे खाद्य उपलब्ध नाही. त्यातच वनक्षेत्रात मानवी हस्तक्षेपामुळे मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरकाव करत आहेत. चांदाेली परिसरातून बाहेर पडलेल्या बिबट्यांसह अन्य वन्य प्राण्यांचा वावर ऊस क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा कृष्णा-वारणाकाठी धोका वाढला आहे. पुढील तीन-चार महिने बिबट्यांचा प्रजनन काळ असल्याने धाेका वाढला आहे. त्यामुळे ऊसतोड कामगार, नागरिक, शेतकऱ्यांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.

मादी बिबट पिलांना जन्म देण्यासाठी ऊस पट्ट्याला सुरक्षित मानत आहे, त्यासाठी ती जंगलातून बाहेर पडते. यामुळे आता माणसानेच सावध राहण्याची वेळ आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हा तीन महिन्यांचा बिबट्यांचा प्रजनन काळ आहे. त्यांना आपल्या बछड्यांची सुरक्षितता जंगलापेक्षा उसात अधिक वाटते. जंगलात बछड्यांना तरसापासून अधिक धोका असतो. त्यामुळे बिबटे बछड्यांना उसात सुरक्षित ठेवण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत. उसात राहून त्यांना गावठी कुत्री, कोल्हे, ससे, घुशी असे भक्ष्य सहज उपलब्ध होते. यामुळे बिबटे उसातच मुक्काम ठाेकतात. सध्या ऊस तोडणी सुरू असल्याने शेतकरी व ऊसतोड मजुरांनी आपल्या व कुटुंबाच्या सुरक्षेसाठी सतर्क राहायला हवे.

शिराळा, शाहूवाडी तालुक्यात अनेक गावांत बिबट्याचे दर्शन होत आहे. पाळीव प्राण्यांवर व माणसांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचे हल्ले थांबवण्यासाठी दीर्घकालीन उपाय आवश्यक आहेत. त्यावर मंथन होतेय, मात्र पुढील तीन महिने महत्त्वाचे आहेत. विशेषतः वारणा, कृष्णा नदीकाठच्या ऊस पट्ट्यातील नागरिकांनी डोळ्यांत तेल घालून राहण्याची गरज आहे.

बिबट्यांचे याच काळात हल्ले

चांदोली अभयारण्यालगत असणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर वारुणपैकी तळीचा धनगरवाडा येथे आठवर्षीय मुलीचा मृत्यू झाला. गतवर्षी केदारलिंगवाडी येथील दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, उखळू येथील नऊ वर्षांच्या मुलावरील हल्ल्याच्या घटना ऑक्टोबर ते डिसेंबर याच काळात घडल्या आहेत. याशिवाय शिराळा तालुक्यात ऊसतोड मजुरांच्या मुलांवरही हल्ले झाले. त्यात एकाचा जीव गेला.


अभयारण्यालगत गावात वावरणारे बिबटे जंगली असल्याने भक्ष्य पकडण्यासाठी ते अधिक आक्रमक असतात. त्या प्रमाणात ऊस क्षेत्रातील बिबट्या आक्रमक नसतो. कारण गावातील मोकाट कुत्री, जनावरे, मोर, वानरे, डुक्कर अशा प्राण्यांवर तो गुजराण करतो. गावकऱ्यांनी सावध राहावे, लहान मुलांना एकटे सोडू नये. - अजितकुमार पाटील, मानद वन्यजीव रक्षक.

Web Title: Leopards breed for four months; Sugarcane workers, farmers need to be aware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.