शेतात मृतावस्थेत आढळला बिबट्या, गावकऱ्यांसह वन अधिकाऱ्यांची धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 04:27 PM2022-02-27T16:27:17+5:302022-02-27T16:40:54+5:30
या बिबट्याचा पंचनामा करुन त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी वनविभागाच्या व्हॅनमधून मृत बिबट्यास इस्लामपूर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले आहे
सांगली - रेठरे धरण ता. वाळवा येथील ओझर्डे शिव या नावाने परिचित असलेल्या संपत जाधव यांच्या शेतात शाळूपिकाच्या मृतावस्थेत बिबट्या आढळून आला आहे. दोन वर्षें वयाच्या नर जातीच्या बिबट्याचा दुसऱ्या बिबट्याच्या झटापटीत मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समजले असून हा मृत बिबट्या शेतकऱ्यांना आढळून आला. घटनास्थळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेऊन या बिबट्याचा पंचनामा केला आहे.
रेठरे धरण गावच्या पश्चिमेला दीड किलोमीटर अंतरावरील ओझर्डे रेठरे धरण हद्दीवरील संपत जगन्नाथ जाधव यांच्या गट क्रमांक ४६३ या शाळू असलेल्या शेतात व विजय आनंदा नांगरे पाटील यांच्या शेताच्या हद्दीवरील बांधावर बिबट्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. या नर बिबट्याचा शनिवारी रात्रीवेळी मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रविवारी सकाळी बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समजताच घटनास्थळी रेठरे धरण येथील नागरिकांनी गर्दी केली होती. घटनास्थळी माहिती घेण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक डॉ अजित साजने यांनी भेट देऊन या बिबट्याच्या शरीरावरील काही जखमा आहेत का याची पाहणी केली. या बिबट्याचा पंचनामा करुन त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी वनविभागाच्या व्हॅनमधून मृत बिबट्यास इस्लामपूर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले आहे
या नर बिबट्याच्या मृत्यूचा शोध घेण्यासाठी श्वानास पाचारण करण्यात येणार आहे. यावेळी वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक रायना पाटोळे, वनरक्षक अमोल साठे, सहाय्यक वनरक्षक शहाजी खंडागळे, वनमजुर अनिल पाटील, पांडुरंग उगळे, सचिन कदम उपस्थित होते. यावेळी रेठरे धरण येथील उद्योजक दादासो पाटील, हर्षवर्धन पाटील, माजी सरपंच सुदाम पाटील,सुहास पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
वनपाल यांनी वर्तवला अंदाज
नर बिबट्याचा मृत्यू एखादा बिबट्या अथवा तरस सारख्या प्राण्याच्या हल्ल्यात किंवा झटापटीत झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वनपाल सुरेश चरापले यांनी या बिबट्याच्या मृत्युबाबत सांगितले की, याच्या शवविच्छेदनमध्ये बिबट्याच्या शरीरावर काही जखमा (छिद्रे)आढळून आल्या. त्या दुसऱ्या बिबट्याने केलेल्या झटापटीत झालेल्या असण्याचा अंदाज असून, नर बिबटे हे दोघे एकत्र राहू शकत नाहीत, ते एकमेकांच्या हद्दीत दुसऱ्यास येऊ देत नाहीत, अशावेळी त्यांच्यात झटपट होण्याच्या घटना घडतात. या मृत झालेल्या बिबट्याचे किडनी, लिव्हर, (व्हिसेरा) तपासणीसाठी नागपूर अथवा अन्य ठिकाणी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून नंतर आणखी माहिती मिळू शकते.
दरम्यान, सदर घटनास्थळापासून शंभर ते दीडशे फुटावर एक कोल्हा चार ते पाच दिवसापूर्वी मरुन पडल्याचे वनअधिकाऱ्यांना दिसून आले आहे. येथील कामेरकर मळा परिसरात पहाटे प्रदीप राजाराम पाटील यांनी पाळलेले त्यांचे कुत्रेदेखील बिबट्याने झडप घालून पळवून नेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे हा बिबट्या हा होता की दुसरा याबाबत साशंकता आहे.