सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, वारणा, कृष्णेची पातळी स्थिर; अलमट्टीतून सव्वालाख क्यूसेकने विसर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 01:32 PM2023-07-29T13:32:40+5:302023-07-29T13:33:05+5:30

शिराळ्यात सर्वाधिक पाऊस

Less rain in Sangli district, Warana, Krishna river level stable | सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, वारणा, कृष्णेची पातळी स्थिर; अलमट्टीतून सव्वालाख क्यूसेकने विसर्ग 

सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, वारणा, कृष्णेची पातळी स्थिर; अलमट्टीतून सव्वालाख क्यूसेकने विसर्ग 

googlenewsNext

सांगली : जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने दिवसभर उघडीप दिली होती. शिराळा तालुक्यासह धरण क्षेत्रातही किरकोळ पाऊस सुरू आहे. यामुळे वारणा आणि कृष्णा नद्यांची पाणीपातळी स्थिर होती. अलमट्टी धरणात सध्या ८७.७३ टीएमसी पाणीसाठा झाला असून ७१.२८ टक्के धरण भरले आहे. सायंकाळी ६ वाजता धरणातील विसर्ग कमी केला आहे. धरणात सध्या १ लाख ३८ हजार ७२२ क्यूसेकने पाण्याची आवक होत आहे. म्हणून ५० हजार क्यूसेकने विसर्ग कमी करून सध्या १ लाख २५ हजार क्यूसेकने विसर्ग चालू आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आणखी चार दिवस पाऊस कायम असणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १४.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. शिराळ्यात पावसाचा जोर जास्त होता. पण, उर्वरित तालुक्यात रिमझिम सरी सुरू होत्या. दिवसभर मात्र फारसा पाऊस झाला नाही. चार दिवसाने सांगली शहरात दुपारी ऊन पडले होते.
अलमट्टी धरणातून गुरुवारी दुपारी दीड लाखांवरून सायंकाळी पावणे दोन लाख विसर्ग करण्यात आला होता. या पावसाळ्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग असल्याचे बोलले जाते.

सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाल्यामुळे अलमट्टी धरणातील विसर्गही शुक्रवारी ५० हजार क्यूसेकने कमी करून सध्या १ लाख २५ हजार क्यूसेकने विसर्ग चालू आहे. धरणाची पाणी क्षमता १२३ टीएमसी असून आता धरणात ८७.७३ टीएमसी पाणीसाठा आहे. ७१ टक्के धरण भरले आहे. पाऊस आणि धरणातील पाणीसाठ्यावर कर्नाटक आणि महाराष्ट्राचे जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत.


धरणातील पाणीसाठा

धरण -आजचा साठा -धरणाची क्षमता
कोयना -६६.९० - १०५.२५
धोम - ९.४७ - १३.५०
कन्हेर - ६.०५ - १०.१०
वारणा - २९.३६ - ३४.४०
अलमट्टी - ८८.५० - १२३

शिराळ्यात सर्वाधिक ३१.८ मिलिमीटर पाऊस

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी १४.४ मिलिमीटर तर शिराळा तालुक्यात सर्वाधिक ३१.८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात दि. १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे. मिरज १७.७ (१९२), जत ६ (१४४.२), खानापूर ९.८ (११४.९), वाळवा १५.५ (२०८), तासगाव १५.५ (१९३), शिराळा ३१.८ (५२१.७), आटपाडी ४ (११२.३), कवठेमहांकाळ १०.३ (१५९.४), पलूस १४.६ (१७७), कडेगाव ११.६ (१३७.५).

Web Title: Less rain in Sangli district, Warana, Krishna river level stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.