निर्भया पथकाकडून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे, मिरजेत कराटे कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 01:45 PM2018-10-11T13:45:29+5:302018-10-11T13:47:41+5:30

स्त्री सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत मिरजेतील निर्भया पथकामार्फत येथील बापुजी साळुंखे महाविद्यालयात सुमारे पाचशे शालेय विद्यार्थीनींना कराटे प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले. या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला असून शाळांनी या कार्याचे उत्स्फूर्त स्वागत केले.

Lessons for self defense by girls from Nirbhaya squad, Miraj karate workshop | निर्भया पथकाकडून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे, मिरजेत कराटे कार्यशाळा

निर्भया पथकाकडून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे, मिरजेत कराटे कार्यशाळा

googlenewsNext
ठळक मुद्देनिर्भया पथकाकडून मुलींना स्वसंरक्षणाचे धडेमिरजेत कराटे कार्यशाळा : पाचशे मुलींचा सहभाग

मिरज : स्त्री सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत मिरजेतील निर्भया पथकामार्फत येथील बापुजी साळुंखे महाविद्यालयात सुमारे पाचशे शालेय विद्यार्थीनींना कराटे प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले. या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला असून शाळांनी या कार्याचे उत्स्फूर्त स्वागत केले.

बापुजी साळुंखे महाविद्यालयात झालेल्या या कार्यशाळेस उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत भारती, मिरज शहर पोलिस पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजू ताशिलदार, बापुजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य उदयसिंह माने-पाटील आदी उपस्थित होते. आरग येथील प्रशिक्षक कलगोंडा पाटील व त्यांच्या पथकाने मुलींना कराटेचे प्रशिक्षण दिले.

ऐनवेळी येणाऱ्या संकटांना कसे तोंड द्यायचे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी भारती म्हणाले की, छेडछाडीपासून महिलांवरील आत्याचाराच्या अनेक घटना आपण ऐकत असतो. अशा घटना थांबल्या पाहिजेत, रोखता आल्या पाहिजेत, असे अनेकांना वाटत असते, पण वाटणे आणि तशी कृती घडणे यात खुप फरक असतो. त्यामुळेच निर्भया पथकाने हा कृतशील कार्यक्रम हाती घेतला आहे.

शासनामार्फत, पोलिस दलामार्फत आता स्त्री सक्षमीकरणाबरोबरचत्यांना तातडीची मदत मिळावी, त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून अधिक सतर्कता बाळगली जाते. स्त्री संरक्षण हा प्राधान्यक्रम आहे.

प्राचार्य माने-पाटील म्हणाले की, पोलिस दलाने घेतलेल्या या उपक्रमाचे आम्हाला कौतुक वाटते. सातत्याने असे उपक्रम झाले तर खऱ्या अर्थाने स्त्री सक्षमीकरणाला बळ मिळेल. ताशिलदार म्हणाले की, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थीनी, महिला या सर्वांप्रती समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.

छेडछाडीच्या, आत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी विद्यार्थीनींना सक्षम करण्याचा उपक्रम पोलिसांनी हाती घेतला आहे. त्यातूनच अशा कार्यशाळा आणि प्रत्येक शाळा, महाविद्यालयात तक्रारपेटीचा उपक्रम सुरू झाला आहे.

निर्भया पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड म्हणाल्या की, नवरात्रोत्सवात देवीचा जागर करतात त्याप्रमाणे आम्ही या नवरात्रीपासून महिला सक्षमीकरणाचा जागर करीत आहोत. महिला या मनानेच नाही तर शरिरानेही ती सक्षम व्हावी म्हणून आम्ही पाऊल उचलले आहे. निर्भया सखींना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. पथकाचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Lessons for self defense by girls from Nirbhaya squad, Miraj karate workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.