विधानसभा आचारसंहिता कधीही लागू द्या, सांगली जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज
By अशोक डोंबाळे | Published: September 14, 2024 07:04 PM2024-09-14T19:04:59+5:302024-09-14T19:05:23+5:30
जिल्ह्यात २४८२ मतदान केंद्रे : आठ विधानसभा मतदारसंघांत ६३३० मतदान यंत्रे पोहोच
अशोक डोंबाळे
सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी सहा हजार ३३० मतदान यंत्रे लागणार आहेत. ती सर्व मतदारसंघाच्या ठिकाणी पोहोच केली आहेत. शासकीय गोदामामध्ये सुरक्षित यंत्रे ठेवली आहेत. तसेच जिल्ह्यातील २४ लाख ५४ हजार ३७७ मतदारांसाठी दोन हजार ४८२ मतदान केंद्रेही केली आहेत. विधानसभा आचारसंहिता कधीही लागू झाली तरी प्रशासनाने मतदार यादी अंतिम करण्यासह निवडणुकीसाठीची सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
राज्य सरकारचा कार्यकाल ३० नोव्हेंबर २०२४ रोजी संपणार आहे. त्यापूर्वी नवीन आमदार निवडून जाणे गरजेचे आहे. म्हणून राज्यात १५ ऑक्टोबरपूर्वी केव्हाही विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. म्हणून जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील जत, इस्लामपूर, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ, सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, शिराळा या विधानसभा मतदारसंघांसाठी लागणारी मतदान यंत्रे मतदारसंघात तपासून पाठविली आहेत. आचारसंहिता जाहीर होताच अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रशिक्षण सुरू होणार आहे.
अशी आहेत मतदान केंद्रे
विधानसभा मतदारसंघ - मतदान केंद्रांची संख्या
मिरज - ३०७
सांगली - ३१५
इस्लामपूर - २९०
शिराळा - ३३४
पलूस-कडेगाव - २८५
खानापूर - ३५६
तासगाव-क.महांकाळ - ३०८
जत - २८७
एकूण - २४८२
निवडणुकीसाठी आम्ही तयार
विधानसभा निवडणुकीची मतदार यादी अंतिम केली असून त्यानुसार मतदानाची केंद्रेही निश्चित केली आहेत. मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण करून आठही विधानसभा मतदारसंघांत पाठविली आहेत. मतदानाच्या दृष्टीने आमची तयारी पूर्ण झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
२०१९ च्या निवडणुकीचे वेळापत्रक
- आचारसंहिता लागू : २७ सप्टेंबर २०१९
- उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख : ४ ऑक्टोबर २०१९
- नामनिर्देशनपत्रांची छाननी : ५ ऑक्टोबर २०१९
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख : ७ ऑक्टोबर २०१९
- मतदानाची तारीख : २१ ऑक्टोबर २०१९
- मतमोजणी : २४ ऑक्टोबर २०१९