सांगलीतील अनिकेतच्या खुनाचा तपास सीबीआयकडे द्या: राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 10:34 PM2017-11-10T22:34:10+5:302017-11-10T22:39:34+5:30
सांगली : अनिकेत कोथळे याचा पोलिसांनी निर्दयीपणे आणि क्रूरपणे खून केला आहे.
सांगली : अनिकेत कोथळे याचा पोलिसांनी निर्दयीपणे आणि क्रूरपणे खून केला आहे. या प्रकरणाची राज्य शासनाने सीबीआयमार्फत त्वरित चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, तसेच आरोपींना सहकार्य करणाºयांनाही त्वरित अटक करावी, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शुक्रवारी केली.
शेट्टी म्हणाले की, केवळ दोन हजार रूपयांची चोरी केल्याच्या आरोपाखाली अनिकेतला अटक करण्यात आली होती. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. असे असताना कोठडीमध्ये असणाºया या तरूणावर रात्री थर्ड डिग्रीचा वापर करण्यात आला. त्याला अक्षरश: उलटा टांगून पाण्यात बुडवून मारहाण करण्यात आली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह संशयितांना अटक करून, तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे.
वास्तविक पोलिस दलातीलच ही घटना आहे. त्यामुळे सीआयडीकडून योग्यरितीने तपास होईल असे वाटत नाही. वारणानगर येथील पोलिसांनी टाकलेल्या दरोड्याचा तपासदेखील संथगतीने सुरू आहे. जिल्'ात गुन्हेगारी विश्वाने तोंड वर काढले आहे. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांचे लक्ष नाही. चिरीमिरीमुळे बिनदिक्कतपणे चालणाºया अवैध व्यवसायांकडे पोलिस दलाचे लक्ष नाही. पोलिसच जर असे वागू लागले, तर न्याय कोणाकडे मागायचा? जिल्'ाचा बिहार होऊन बसलेला आहे, तरीही गृहखाते मूग गिळून गप्प आहे.
दोषी लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत. त्यामुळे पोलिस दलाची बदनामी होत आहे. अनिकेतच्या खुनामागे नेमका कोणाचा हात आहे? त्याला ठार मारण्याची सुपारी देण्यात आली होती, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. एवढी मोठी घटना घडूनदेखील पोलिस अधीक्षक शिंदे, पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना पुसटशीदेखील कल्पना कशी नव्हती? अनिकेत कोठडीतून पळून गेला आहे, अशा बतावण्या करण्यात आल्या होत्या.
या सर्व पार्श्वभूमीवर सीआयडीकडून या प्रकरणाचा योग्यरित्या तपास होईल असे वाटत नाही. त्यामुळे हे खून प्रकरण आणि वारणानगर येथील पोलिसांनी मारलेल्या कोट्यवधी रूपयांच्या डल्ल्याचे प्रकरण या दोन्ही प्रकरणांचा तपास त्वरित सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.