सहकारमंत्र्यांना ‘सळो की पळो’ करू : शेट्टी
By admin | Published: April 18, 2016 11:53 PM2016-04-18T23:53:10+5:302016-04-19T00:58:21+5:30
शेतकरी मेळावा : एफआरपीसाठी १ मेनंतर ‘आर या पार’ची लढाई
सांगली : एफआरपीची उर्वरित २० टक्के रक्कम देण्याबरोबरच जादा दराची रक्कमही शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. येत्या ३० एप्रिलपर्यंत यावर निर्णय झाला नाही, तर कायदा हातात घेतला जाईल. याप्रश्नी सहकारमंत्र्यांना सळो की पळो करून सोडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी येथील शेतकरी मेळाव्यात दिला.
येथील विष्णुअण्णा फळ मार्केट परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा पार पडला. यावेळी ते म्हणाले की, शेतकऱ्यांना एफआरपीची उर्वरित रक्कम तातडीने मिळाली पाहिजे. त्याशिवाय साखरेला जादा भाव मिळाल्याने त्याचाही मोबदला शेतकऱ्यांच्या पदरात पडला पाहिजे. साखर कारखानदार याप्रश्नी टाळाटाळ करीत आहेत. ३० एप्रिलपर्यंत पैसे मिळाले पाहिजेत. कारखानदार जर दाद देत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करा. कारखानदारांना शेतकऱ्यांचे पैसे देणे जमत नसेल, तर त्यांच्या वाट्याची साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना द्यावी. आम्ही ती बाजारात विकून आमचे पैसे काढून घेऊ. सहकार विभागाने नियमानुसार कारवाई न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनाच कायदा हातात घेईल.
शेतकऱ्यांच्या उर्वरित बिलातून निर्यातीसाठी दिलेल्या नुकसानभरपाईची रक्कम कपात करण्याचा डाव काही साखर कारखानदारांनी आखला आहे. त्यांना याचा कोणताही अधिकार नाही. असे कृत्य कोणी केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी लढा देऊ. पुढील हंगामावेळी साखरेचे भाव अधिक असले, तर एफआरपी न मागता आम्ही पहिली उचल मागू. साखरेचे दर कमी असतील त्याचवेळी एफआरपीची केली जाईल.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही संघटना जन्माला आल्याने संघर्षावेळी सरकार कोणाचे आहे, हे आम्ही पाहणार नाही. येत्या १ मेपासून कारखानदार व शासनाच्याविरोधात निर्णायक लढाई सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
सहकारी बॅँकांमधील घोटाळा प्रकरणात अडकलेल्या नेत्यांबद्दल ते म्हणाले की, सहकार कायद्यातील नियमानुसार पाच वर्षांपूर्वीचा घोटाळा माफ केला जात असेल, तर पाच वर्षापूर्वी चोरी करणाऱ्या संशयितांनाही सोडून देण्याचा निर्णय सरकारने घ्यावा. अशाप्रकारच्या कायद्यातील पळवाटा बंद करून घोटाळेबहादरांवर कारवाईचे धाडस सहकारमंत्र्यांनी दाखवावे.
मेळाव्यास संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, प्रवक्ते महेश खराडे, बाजार समितीचे सभापती संतोष पाटील, संभाजी मेंढे, प्रकाश वलवडकर, सागर खोत, भगवान काटे, संदीप राजोबा आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
एकही लाल दिवा सुरक्षित राहणार नाही!
राज्य शासन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सदाभाऊ मध्यस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी सहकारमंत्र्यांना समजावून सांगावे. येत्या ३० एप्रिलपर्यंत शासनाने उर्वरित रकमेच्या प्रश्नात लक्ष घातले नाही, तर सांगली, कोल्हापुरात एकही लाल दिवा सुरक्षित राहणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
मुश्रीफ यांच्या कॉल रेकॉर्डची तपासणी करा
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले मुश्रीफ-शेट्टी वाक्युद्ध मेळाव्याच्या निमित्ताने कायम राहिले. वारंवार माझ्या तपासणीची मागणी करणाऱ्या आ. हसन मुश्रीफ यांच्या कॉल रेकॉर्डची तपासणी व्हावी, माझेही कॉल तपासावेत. तपासणीत परदेशात कोणाचा संवाद होतो, कोणाचे काळे-बेरे आहे, आरोपी कोण आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे समोर येतील, असे शेट्टी म्हणाले.
कारवाई करा,
रेडे बोलतील...
पुराणात रेड्याने वेद म्हटल्याची कथा आहे. या कथेप्रमाणे रेडे बोलावेत असे वाटत असेल, तर सहकारमंत्र्यांनी त्यांचे कारवाईचे कर्तव्य पार पाडावे. साखर उत्पादित होण्यापूर्वी तिची विक्री कशी झाली?, कवडीमोल दराने कारखाने कसे विकले गेले?, या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना व राज्यातील जनतेला मिळतील, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली.
गोपनीय संदेश मिळेल !
आंदोलनाबाबत येत्या २७ किंवा २८ एप्रिल रोजी शेतकऱ्यांना गोपनीयरित्या संदेश दिला जाईल. त्यानंतर संदेशाप्रमाणे आंदोलनासाठी त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले.
मंत्रीही दरोडेखोरांना सामील?
आम्ही राज्यातील सहकारी साखर कारखानदारीतील काळ्या पैशाच्या गुंतवणुकीबद्दल ओरड करत असतानाही, विद्यमान सरकार काहीही करीत नाही. त्यामुळे पांढऱ्या कपड्यातील या दरोडेखोरांना सध्याचे मंत्रीही सामील झाले आहेत की काय?, अशी शंका येत आहे. सांगलीच्या बाजार समितीमधील एका भ्रष्ट कर्मचाऱ्याला ४२ लाखांच्या अपहारप्रकरणी बडतर्फ करण्यात आल्यानंतर, सहकारमंत्री त्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी शिफारस करीत आहेत. या गोष्टीवरून जनतेने काय समजायचे?, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.