कुपवाड ड्रेनेजचा ‘अमृत’मध्ये समावेश करू

By admin | Published: April 5, 2017 11:26 PM2017-04-05T23:26:52+5:302017-04-05T23:26:52+5:30

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : उपमहापौर गट व स्वाभिमानी आघाडीकडून साकडे, दुसऱ्या टप्प्यात समावेश

Let us incorporate Kupwara Drainage into 'Amrut' | कुपवाड ड्रेनेजचा ‘अमृत’मध्ये समावेश करू

कुपवाड ड्रेनेजचा ‘अमृत’मध्ये समावेश करू

Next



सांगली : कुपवाड ड्रेनेज योजनेला शासनाच्या अमृत योजनेतून वगळण्यात आले होते. याबाबत बुधवारी उपमहापौर गट व स्वाभिमानी आघाडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन, कुपवाड ड्रेनेज योजनेला मंजुरी देण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात कुपवाड ड्रेनेज योजनेचा समावेश करण्याची ग्वाही दिल्याची माहिती उपमहापौर गटाचे नेते शेखर माने यांनी दिली.
कुपवाड ड्रेनेज योजनेचा समावेश गेल्यावर्षी अमृत योजनेत केला होता. या योजनेसाठी १०३ कोटी ६५ लाखांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र पहिल्या टप्प्यातील निधी मिरज पाणीपुरवठा योजनेसाठी दिला होता. दुसऱ्या टप्प्यात कुपवाड ड्रेनेज योजनेला निधी मिळण्याची आशा होती. मात्र शासनाने २०१७-१८ चा राज्यस्तरीय वार्षिक कृती आराखडा जाहीर केला आहे. यामध्ये कुपवाड ड्रेनेज योजनेचा निधी बार्शीकडे वळविला होता. त्यामुळे उपमहापौर गटाचे नेते शेखर माने, गौतम पवार यांच्या नेतृत्वाखाली कुपवाडच्या नगरसेवकांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
शेखर माने म्हणाले, सांगली व कुपवाड पाणीपुरवठा योजनेच्या ५६ व ७० एमएलडी जलशुध्दीकरण केंद्राचे काम प्रगतीपथावर असून, काही दिवसात ही योजना मार्गी लागणार आहे. शासन कुपवाड ड्रेनेज योजनेला मान्यता देऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत ही पाणीपुरवठा योजना पूर्ण होईल. पाणीपुरवठ्यातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागण्याची गरज आहे. सध्या कुपवाडला ड्रेनेज अस्तित्वात नाही. त्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. त्यासाठी कुपवाड ड्रेनेज योजनेला मंजुरी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील यादीत कुपवाड ड्रेनेज योजनेचा समावेश करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच या योजनेच्या मंजुरीबाबत टिप्पणी तयार करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर यांना दिल्याचेही माने यांनी सांगितले. त्यामुळे कुपवाड ड्रेनेज योजनेला मुख्यमंत्री लवकरच मान्यता देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उपमहापौर विजय घाडगे, नगरसेवक गौतम पवार, गजानन मगदूम, शिवराज बोळाज, निर्मला जगदाळे, सुरेखा कांबळे, संगीता खोत, वंदना कदम उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Let us incorporate Kupwara Drainage into 'Amrut'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.