वीज बिल माफीसाठी मंत्र्यांच्या गाड्या अडवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:20 AM2021-07-01T04:20:16+5:302021-07-01T04:20:16+5:30
सांगली : कोरोना, लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल सुरू असताना थकीत वीज बिलापोटी महावितरण कंपनीकडून कनेक्शन तोडण्याचे प्रकार सुरू आहेत. ...
सांगली : कोरोना, लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल सुरू असताना थकीत वीज बिलापोटी महावितरण कंपनीकडून कनेक्शन तोडण्याचे प्रकार सुरू आहेत. शासनाने वीज बिल माफीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा पालकमंत्री, कृषी राज्यमंत्र्यांच्या गाड्या अडवू, असा इशारा सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी बुधवारी दिला.
पवार म्हणाले की, कोरोनामुळे जिल्ह्याचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत आहे. व्यापारी, उद्योजकांपासून ते कामगार, नोकरदार, रोजंदारी, हमाल, तोलाईदारांनाही संघर्ष करावा लागत आहे. आर्थिक संकटात सरकारने मदतीचा हात देणे अपेक्षित होते. त्यातच वीज बिलांबाबत आघाडी सरकारने घोळ घातला आहे. आता महावितरणचे कर्मचारी वीज कनेक्शन तोडत आहेत. वीज बिलाबाबत व्यवहार्य तोडगा काढावा, अशी मागणी आहे. सर्वसामान्य घटक, हमाल, रिक्षावाले, रोजंदारीवरील लोक, दुकान व घरेलू कामगार अशांना पूर्ण वीज बिल माफी दिली पाहिजे. इतरांना लॉकडाऊन काळातील वीज बिलात किमान पन्नास टक्के सवलत आणि या काळातील थकीत बिल भरण्यासाठी किमान दोन वर्षांचे समान हप्ते पाडून दिले पाहिजेत. पण याबाबत कसलाच निर्णय घेतला जात नाही. पालकमंत्री जयंत पाटील व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी तत्काळ यावर तोडगा काढावा, अन्यथा त्यांच्या आगामी दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाड्या अडवू, असा इशाराही पवार यांनी दिला.
चौकट
सर्वपक्षीयांची लवकरच बैठक
पालकमंत्री जयंत पाटील यांनी राज्याचा दौरा थांबवून वाळवा तालुक्यात तळ ठोकण्याची गरज आहे. एका तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा लाॅकडाऊनची स्थिती आली. महापालिकेनेही विविध करांसाठी सक्तीची भूमिका घेतली आहे. त्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या आठवड्यात सर्वपक्षीय कृती समितीची बैठक घेणार असल्याचे पवार म्हणाले.