आंदोलनांमधून राज्यकर्त्यांची झोप उडवून देऊ..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 11:51 PM2017-12-03T23:51:21+5:302017-12-03T23:51:21+5:30

Let's blow the rulers from sleep! | आंदोलनांमधून राज्यकर्त्यांची झोप उडवून देऊ..!

आंदोलनांमधून राज्यकर्त्यांची झोप उडवून देऊ..!

Next


सांगली : देशातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचा सार्थ अभिमान आहे. आपल्या देशात अनेक धर्म आहेत. त्यांना लोकशाही मार्गाने मान्यता मिळाली आहे. परंतु प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या लिंगायत धर्माला मान्यता नाही. ती प्रदान न केल्यास राज्यकर्त्यांची झोप उडवू, प्रसंगी दिल्लीपर्यंत धडक मारली जाईल, असा इशारा लिंगायत समाजातील मुलींनी दिला.
विश्रामबाग चौकात मोर्चेकरी जमल्यानंतर व्यासपीठावर समाजातील मान्यवरांची व काही मोजक्याच मुलींची भाषणे झाली. मुलींची भाषणे प्रभावी झाल्यानंतर समाजबांधवांनी टाळ्या व शिट्ट्यांनी दाद दिली. आस्था महेश चौगुले (मिरज), समृद्धी सुरेश केरीपाळे (सांगली), सिद्धी संतोष पट्टणशेट्टी (जत), रसिका किरण बोडके (तासगाव), कृतिका गाडीवान (नांदेड) व प्रियांका महाजन (सांगली) या मुलींची भाषणे झाली.
आस्था चौगुले म्हणाली, स्वातंत्र्यपूर्व काळात आमच्या धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता होती; पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती मान्यता काढून घेण्यात आली. म्हणजे जेव्हा देश पारतंत्र्यात होता, तेव्हा लिंगायत धर्म स्वतंत्र होता आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतर तो पारतंत्र्यात गेला. लोकशाही पद्धतीने आम्ही आमच्या मागण्या व हक्क मांडत आहे. शासनाने याकडे दुर्लक्ष करू नये. आम्हाला स्वतंत्र लिंगायत धर्माची मान्यता द्यावी.
समृद्धी केरीपाळे म्हणाली, महात्मा बसवेश्वरांच्या शिकवणीत वाढलेले आम्ही लिंगायत जोपर्यंत शांत आहे, तोपर्यंत शांत आहे, पण असा अथांग महासागररूपी लिंगायत समाज जर खवळला, तर काय होईल. आमचा धर्म आम्हाला मिळाल्याशिवाय हा वाद शमणार नाही. आम्हाला खुर्ची नको, राजकारण नको, खासदारकी नको...आम्हाला हवा आहे फक्त आमचा हक्क आणि स्वतंत्र लिंगायत धर्माची शासनमान्यता.
रसिका बोडके म्हणाली, लिंगायत धर्माला कोठेही सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात मान-सन्मान नाही. समाज पिचला आहे. आजपर्यंत हा समाज उपेक्षितच राहिला आहे. आम्ही फक्त आमची ओळख व आमचा हक्क मागत आहोत. शासनदरबारी आमच्या धर्माची स्वतंत्र धर्म म्हणून नोंद करावी
नांदेडच्या कृतिकाचे तडाखेबाज भाषण
नांदेडच्या कृतिका गाडीवान हिचे तडाखेबाज भाषण झाले. लिंगायत धर्ममान्यतेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले, तर लिंगायत समाज स्वस्थ बसणार नाही. प्रसंगी राज्यकर्त्यांची झोप उडवून देईल, असे कृतिकाने म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. आमच्या न्याय्य हक्कांसाठी हा लढा उभा केला आहे. लवकरच मुंबईतही मोर्चा काढणार आहोत. त्यानंतर आम्ही दिल्लीत धडक मारण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा इशाराही कृतिकाने दिला. राष्टÑसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी तिचा सत्कार केला.
भीक नव्हे, हक्क द्या : सिद्धी पट्टणशेट्टी
सिद्धी पट्टणशेट्टी म्हणाली, लिंगायत धर्म नेहमी देशाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये प्रगती करीत आहे. आज जगामध्ये आमच्या लिंगायत धर्मानंतर स्थापन झालेल्या धर्माची ओळख आहे. पण नऊशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आमच्या धर्माची ओळख नाहीशी होत आहे. स्वतंत्र धर्ममान्यतेसाठी भीक मागत नसून, आम्ही आमचा हक्क मागत आहोत. प्रियांका महाजन, निशांत मगदूम यांचीही भाषणे झाली.

Web Title: Let's blow the rulers from sleep!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.