‘कृष्णे’वरील भाजपची सत्ता घालवण्यासाठी तडजोड करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:22 AM2021-01-15T04:22:40+5:302021-01-15T04:22:40+5:30
शिरटे : भाजपाच्या हाती असलेला यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात घेण्यासाठी आपण तडजोडीची भुमिका घेण्यास तयार ...
शिरटे : भाजपाच्या हाती असलेला यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात घेण्यासाठी आपण तडजोडीची भुमिका घेण्यास तयार असल्याचे मत माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले. तर मनोमिलन न करण्याच्या भूमिकेवर माजी अध्यक्ष अविनाश मोहिते अजूनही ठाम आहेत. त्यामुळे निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार याबाबत सभासदांतून संम्रमावस्था झाली आहे.
भाजपाची सत्ता घालविण्यासाठी राज्यात सत्तास्थापनेसाठी केलेला महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. हाच प्रयोग कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राबविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
याबाबत डॉ. मोहिते म्हणाले, महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीला दिशा देणारा यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना हा राजकारणाचा अड्डा बनू देणार नाही. वडिलांचे नावे असणारा कारखाना सहकारात टिकावा, वाचावा यासाठी समविचारी लोकांना सोबत घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार आहोत. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व विलासराव पाटील-उंडाळकर गट; तसेच कदम कुटुंबीयांची साथ आमच्यासोबत असेल. पदवीधरचे नूतन आ. अरुण लाड यांच्या विजयासाठी आमचाही हातभार लागला आहे. त्यामुळे त्यांचाही विचार आमच्याशी जुळेल. तर महाराष्ट्राचे नेते व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री जयत पाटील हेसुध्दा आम्हाला साथ देतील. त्यामुळे सत्ताधारी गटाला सत्तेतून घालवायचे असेल तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मानणाऱ्या दोन माजी अध्यक्षांनी एकत्र यावे, अशी चर्चा सभासदांतून होत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व कृष्णाचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी सत्ताधारी व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यावर टीकेची झोड उठवित कोणत्याही परिस्थितीत मनोमिलन करणार नसल्याबाबत ते ठाम आहेत. सध्यातरी मनोमिलन व महाविकास आघाडी हा मुद्दा गौण असून तिन्ही गटांकडून सभासदांशी संपर्क साधला जात आहे.
फोटो
डॉ. सुरेश भोसले, डॉ.इंद्रजित मोहिते,आविनाश मोहिते.