काेरोना व महापुराच्या दुहेरी संकटाला सक्षमपणे समोरे जाऊया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:23 AM2021-07-25T04:23:16+5:302021-07-25T04:23:16+5:30
भिलवडी : सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी भिलवडी व धनगाव परिसरातील पूरपरिस्थितीची पाहणी केली. विविध शाळांमध्ये ...
भिलवडी : सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी भिलवडी व धनगाव परिसरातील पूरपरिस्थितीची पाहणी केली. विविध शाळांमध्ये स्थलांतरित केलेल्या पूरग्रस्तांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या, त्यांना धीर दिला. कोरोना आणि महापुराच्या दुहेरी संकटाला आपण सक्षमपणे सामोरे जाऊया. भिऊ नका मी सदैव तुमच्यासोबत आहे, अशा शब्दांत धीर दिला.
गेल्या दोन दिवसात कृष्णेला अचानक आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात लोकांनी स्थलांतर केले आहे. सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, भिलवडी, जिल्हा परिषद शाळा, माळवाडी आणि भारती विद्यापीठ, खंडोबाचीवाडी येथे भिलवडीतील तर बुरूंगवाडी येथील ब्रम्हानंद विद्यालयात धनगावमधील पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली आहे. कदम यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधून त्यांना धीर दिला. स्थानिक नेते व प्रशासनासोबत चर्चा करून किती लोक अडकलेत, जनावरांची काय व्यवस्था केली आहे, याची माहिती घेतली.
कोरोनाच्या लढाईपेक्षा पुराचे संकट नक्कीच वेदनादायी आहे. तरीही माझा कृष्णाकाठ या दुहेरी संकटाला सक्षमपणे तोंड देत आहे. मी सर्व परिस्थितीवर नजर ठेवून आहे. या संकटाचा आपण मिळून सामना करूया, असा आशावाद कदम यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार निवास ढाणे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, चंद्रकांत पाटील, धनगावचे सरपंच सतपाल साळुंखे, सुनील जाधव, दीपक भोसले, संदीप यादव, गौसमहंमद लांडगे, भिलवडीचे सहाय्यक निरीक्षक कैलास कोडग आदी उपस्थित होते.
फोटो : २३ भिलवडी १
ओळ : बुरूंगवाडी (ता. पलुस) येथे डॉ. विश्वजित कदम यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला.