गदिमा स्मारक वर्षात पूर्ण करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 11:58 PM2018-10-01T23:58:45+5:302018-10-01T23:58:50+5:30
करगणी : गदिमांच्या जन्मभूमीत जन्मशताब्दी वर्षातच सर्व सोयी-सुविधांनीयुक्त असे परिपूर्ण स्मारक पूर्णत्वाकडे नेणार असून, आटपाडीत नाट्यगृह उभारणार असल्याचे प्रतिपादन आमदार अनिल बाबर यांनी केले. ते शेटफळेतील गदिमा पारावरील साहित्य मेळाव्यात बोलत होते.
शेटफळेतील २३ व्या गदिमा पारावरील साहित्य मेळाव्याचे उद्घाटन आमदार बाबर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. कृष्णा इंगोले होते.
यावेळी आमदार बाबर म्हणाले, गदिमा हे अभिजात लेखक, कवी होते. ते साहित्यातून राजकारणात आलेले होते. त्यामुळे शासनाला व प्रशासनाला विनंती करणार आहे की, गदिमांचे जन्मशताब्दी वर्ष हे चांगल्या पध्दतीने साजरे व्हायला हवे. गदिमांचे आचार, विचार, साहित्य सर्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी परिपूर्ण असे स्मारक उभारणार आहे. गदिमांचा साहित्य वारसा नवीन पिढीने जोपासला आहे. माणदेशातले साहित्य अजरामर ठेवण्याचे काम केले आहे. जन्मशताब्दी वर्षाच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन करा.
यावेळी डॉ. कृष्णा इंगोले म्हणाले की, गदिमांच्या विचारधारा जीवन समृध्द करणाऱ्या माणसाचे जीवन मांडणारे आहे. या व्यासपीठाने अनेक नामवंत साहित्यिक घडवले आहेत. अपूर्ण स्मारक पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी डॉ. सयाजीराजे मोकाशी, प्रा. संभाजी गायकवाड, प्रा. सी. पी. गायकवाड यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
नाट्यगृह उभारणार
आटपाडीमध्ये गदिमांच्या नावे नाट्यगृह उभारणार असून, याबाबत अर्थमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे. जागेचा शोध सुरू आहे. लवकरच मार्ग निघेल. नाट्यगृहाबरोबरच गदिमा स्मारकाचे अर्धवट काम पूर्ण करणार असल्याचे आ. अनिल बाबर यांनी सांगितले.
आ. अनिल बाबर व
मान्यवरांच्या हस्ते प्रा. संभाजी गायकवाड यांच्या ‘चुकलेलं पाऊल’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अनिल बाबर यांनी किमान स्मारकाबाबत तरी माझी पावले चुकणार नाहीत, अशी ग्वाही देत स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा विश्वास दिला.