संघर्षाच्या तयारीनेच विधानसभा मैदानात उतरू: जयश्रीताई पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 11:58 PM2019-01-27T23:58:30+5:302019-01-27T23:58:35+5:30

सांगली : मदनभाऊ पाटील यांचे नेतृत्व संघर्षातून उभे राहिले होते. अनेक पराभव त्यांनी पचविले होते. संघर्षातून जे मिळते, तेच ...

Let's go to the Legislative Assembly for the sake of struggle: JayashreeTai Patil | संघर्षाच्या तयारीनेच विधानसभा मैदानात उतरू: जयश्रीताई पाटील

संघर्षाच्या तयारीनेच विधानसभा मैदानात उतरू: जयश्रीताई पाटील

Next

सांगली : मदनभाऊ पाटील यांचे नेतृत्व संघर्षातून उभे राहिले होते. अनेक पराभव त्यांनी पचविले होते. संघर्षातून जे मिळते, तेच अधिक काळ टिकते. माझ्यावर कितीही संकटे येऊ द्यात, मी डगमगणार नाही. संघर्षाची तयारी ठेवून शेवटच्या श्वासापर्यंत कार्यकर्त्यांसोबत राहीन, अशी ग्वाही देत, सांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणार असल्याचे काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई मदन पाटील यांनी रविवारी स्पष्ट केले.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विष्णुअण्णा भवन येथे मदनभाऊ गटाचा मेळावा झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. पाटील म्हणाल्या की, सांगली मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते, तुम्ही काय करणार?, अशी विचारणा करीत होते. मदनभाऊंवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी ही बैठक घेतली आहे. मदनभाऊंप्रमाणेच मीही शेवटच्या श्वासापर्यंत कार्यकर्त्यांसोबत राहणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी भाऊंसारखेच स्वाभिमानी राहावे. लोकशाहीत सर्वांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. त्यानुसार मीही विधानसभेसाठी उमेदवारी मागणार आहे. काँग्रेस पक्षाकडून त्याचा निश्चित विचार होईल.
सध्या देशातील परिस्थिती बदलली आहे. सर्वच घटक भाजपवर नाराज आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनीही रस्त्यावर उतरले पाहिजे. लवकरच लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. कुणी कितीही वावड्या उठवू दे, सर्वांनी पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे. जिल्ह्यात पक्षातील ज्येष्ठ नेते आता नाहीत. त्यामुळे वसंतदादांचा, काँग्रेसचा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.
माजी महापौर किशोर जामदार म्हणाले, हा मेळावा काँग्रेसमधील कोणत्याही इच्छुक उमेदवाराच्या विरोधात नाही. मदन पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा जयश्रीतार्इंना उमेदवारी मागण्यासाठी हा मेळावा आहे. त्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत प्रयत्न करावे लागणार आहेत. मदनभाऊंच्यावेळी कुणामुळे पराभव झाला, कुणी उमेदवार उभे केले, हे साºयांनाच माहीत आहे. पण या चुका दुरूस्त करून पुढे जावे लागणार आहे. जिल्ह्यातील पाडापाडीचे राजकारणही बंद झाले पाहिजे.
यावेळी बुधगावचे अनिल डुबल म्हणाले, मदनभाऊंनी लढविलेल्या निवडणुकांचा निकाल पाहता, त्यांना मिळणारी मते पक्की आहेत. विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. सर्वांनी जयश्रीतार्इंना निवडून आणण्याची शपथ घ्यावी.
डॉ. नामदेव कस्तुरे म्हणाले की, मदनभाऊ गटाइतके कार्यकर्ते कुठल्याच इच्छुकांकडे नाहीत. त्यामुळे जयश्रीतार्इंचाच पक्षश्रेष्ठींनी विचार करावा. करीम मेस्त्री म्हणाले, मदनभाऊंना काहींनी धोका दिला होता. पण जयश्रीतार्इंच्याबाबतीत हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.
अजित सूर्यवंशी म्हणाले की, मदनभाऊंचा पराभव झाला तरी, आम्ही खचलो नाही. २००४ प्रमाणे यंदाही काँग्रेसचा गड सर करू.
प्रा. शिकंदर जमादार, रत्नाकर नांगरे, हारुण शिकलगार, सुभाष खोत, नरसगोंडा पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांची यावेळी भाषणे झाली.
तिघांमधील भांडणे मिटवा : नायकवडी
नगरसेविका वहिदा नायकवडी म्हणाल्या की, मदन पाटील यांच्यामुळेच आमचा काँग्रेस प्रवेश झाला होता. ते आमचे नेते होते. त्यांच्याशी काही मुद्द्यावर पटले नाही, म्हणून ते आमचे नेते नव्हते, असे नाही. वसंतदादा घराण्यातच लोकसभा आणि विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी आमची मागणी आहे. प्रतीक, विशाल पाटील यांच्याशी तुमचे काय भांडण आहे, माहीत नाही. मदनभाऊ त्या दोघांनाही लहान भावाप्रमाणे मानत होते. तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्हीच पुढाकार घ्या. तुमच्या तिघातील भांडण मिटवावे. त्यासाठी विजय वाड्यावर बसा किंवा साई वाड्यावर बसा, पण वाद मिटवून केवळ आम्हाला आदेश द्या, असे आवाहन त्यांनी केले.

 

 

Web Title: Let's go to the Legislative Assembly for the sake of struggle: JayashreeTai Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.