सांगलीत ‘चला नदीकडे जाऊया’ अभियान सुरू, पहिल्याच दिवशी २ टन कचरा उठाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 19:39 IST2025-02-26T19:38:53+5:302025-02-26T19:39:34+5:30

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आयोजन

Let's go to the river campaign started in Sangli Pick up 2 tons of garbage on the first day | सांगलीत ‘चला नदीकडे जाऊया’ अभियान सुरू, पहिल्याच दिवशी २ टन कचरा उठाव

सांगलीत ‘चला नदीकडे जाऊया’ अभियान सुरू, पहिल्याच दिवशी २ टन कचरा उठाव

सांगली : राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त सांगली शहरात सामाजिक बांधीलकी जपत स्वच्छतेसाठी निर्धार फौंडेशनच्या तरुणांनी ‘चला नदीकडे जाऊया’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली. यामध्ये सांगलीकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कृष्णा नदीकाठी स्वच्छता मोहिमेत योगदान दिले.

गेल्या काही वर्षांत कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांनी या समस्येची जाणीव ठेवून नदीच्या संवर्धनासाठी पुढे यावे, या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. २१ दिवसांपासून विशेष स्वच्छता मोहीम राबविली जात असून अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमात सतीश दूधाळ, मुस्तफा मुजावर, शशिकांत ऐनापुरे, हिमांशू लेले, रंजीत चव्हाण, मोहन शिंदे, सचिन ठाणेकर, पवन ठोंबरे, दादा शिंदे, सुरज कोळी, अनिल अंकलखोपे, भाग्यश्री दिवाळकर, शकील मुल्ला आदींनी सहभाग घेतला.

पहिल्याच दिवशी २ टन कचरा उठाव

पहिल्याच दिवशी ४० स्वच्छतादूतांनी अवघ्या दोन तासांत सरकारी घाट आरशासारखा स्वच्छ केला. दोन टन कचरा उठाव केला. सामाजिक संघटनांचा सकारात्मक प्रतिसाद उपक्रमास मिळत आहे. पुढील काही दिवसांत या उपक्रमात नागरिकांचा आणखी मोठा सहभाग अपेक्षित आहे.

पाचजणांना जीवनगौरव पुरस्कार

निर्धार फौंडेशनच्या वतीने सांगली शहरात स्वच्छता, प्लास्टिक निर्मूलन या कामी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पाचजणांना प्रतिवर्षी ‘संत गाडगेबाबा जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे प्रमुख राकेश दड्डणावर यांनी दिली.

नदी ही आपल्या जीवनाचा आधार आहे. तिची स्वच्छता व संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे. गेल्या २१ दिवसांपासून आम्ही कृष्णामाईसाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवित आहोत, पण ही चळवळ अधिक व्यापक व्हावी म्हणून संत गाडगेबाबा जयंतीच्या निमित्ताने 'चला नदीकडे जाऊया' अभियान सुरू केले. पहिल्याच दिवशी नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. - राकेश दड्डणावर, संस्थापक, निर्धार फाऊंडेशन.

Web Title: Let's go to the river campaign started in Sangli Pick up 2 tons of garbage on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.