आहाराबाबत थोडे शरीराचेही ऐकू या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:27 AM2021-04-21T04:27:13+5:302021-04-21T04:27:13+5:30
डॉक्टर, दोन दिवस ताप होता, लंघन केल्यावर बरे वाटले. ताप कमी आहे, फक्त भाताजी पेज घेतलीय, आता बरे वाटतेय. ...
डॉक्टर, दोन दिवस ताप होता, लंघन केल्यावर बरे वाटले. ताप कमी आहे, फक्त भाताजी पेज घेतलीय, आता बरे वाटतेय. आज थोडा वरणभात खाऊ का?, थोडे सूप घेतले तर चालेल का?
डॉक्टर आणि रुग्णांतील हे संभाषण नेहमीच ऐकायला मिळते. कोरोनामध्ये ताप हे प्राथमिक लक्षण आहे. यामध्ये पचनशक्ती खूपच कमी होते. काही खावेसे वाटत नाही. अशक्तपणा वाढतो. औषधे पचविण्याची ताकद राहत नाही. अशा रुग्णांना आयुर्वेद लंघनाचा सल्ला देते. ते फायदेशीरही ठरते. शरीरातील अवयवांना, पचनसंस्थेला विश्रांती मिळते. बिघाड दुरुस्तीसाठी शरीराला वेळ मिळतो.
आयुर्वेदाने हजारो वर्षांपासून हा आहार सिद्ध केलेला आहे; पण कोरोना काळात अंडी, मटण, चपाती यावर जोर दिसत आहे. कोरोनाग्रस्तांना प्रथिनांच्या नावाखाली दिवसातून तीन-तीनदा अंडी दिली जाताहेत. यामुळे शुद्ध शाकाहारी रुग्ण संभ्रमात आहेत, धर्मसंकटात सापडले आहेत. जीव वाचवायचा की धर्म, असे संकट आहे.
कोरोनामध्ये ताप थोडासा कमी झालेल्या रुग्णांना हलका व पातळ आहार फायदेशीर ठरतो. भाताची पेज, मुगाचे कढण थोडेथोडे घ्यावे. ते पचल्यास तूप, वरणभात, मुगाच्या डाळीची खिचडी, भुकेनुसार वरईचा भात किंवा ज्वारीची भाकरी द्यावी. या आहारात वेगळे काहीच नाही. वर्षानुवर्षे भारतीयांनी त्याचा अंगीकार केलाय. बहुतेक कोरोनाग्रस्तांना भूक नसते. मळमळ, उलटी होते. औषधांमुळे पित्त वाढते. पोट साफ होत नाही. अशावेळी पचायला जड सामिष आहार कितपत समर्थनीय आहे? अशक्तपणामुळे पोट खपाटीला लागलेल्या रुग्णाला या पैलवानी आहाराची गरज अजिबात नाही. तापामध्ये कडकडून भूक लागेपर्यंत पोट रिकामे ठेवण्याचा हमखास फायदा होतो. कोमट पाणी पिण्याचाही फायदा होतो. शरीरातील बिघाड दुरुस्तीसाठी वेळही द्यायला हवा. औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेले पेजेसारखे पातळ पदार्थ अशा आजारांत कामी येतात. गूळवेल, पटोल, काडेचिराईत ही कडू रसाची औषधे प्रभावी ठरतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले शरीर वेळोवेळी सिग्नल देत असते. चक्र कुठेतरी बिघडत असल्याचे सांगत असते. अशावेळी डॉॅक्टरांकडून औषधे नक्कीच घ्या, पण आहाराच्या बाबतीत शरीराच्या डॉक्टरचेही ऐकायला शिकू या!
(लेखक सांगलीतील आयुर्वेदाचार्य आणि योगशिक्षक आहेत.)