उन्हाळी सोयाबीन बियाणेप्रकरणी चौकशी करून मदत देऊ, कृषिमंत्री दादा भुसेंचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 05:02 PM2022-05-12T17:02:20+5:302022-05-12T17:46:22+5:30
निकृष्ट उन्हाळी सोयाबीन वाणामुळे झालेल्या नुकसानीची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली जाईल.
भिलवडी : मुदत संपून गेल्यानंतरही परिपक्व न झालेल्या सांगली जिल्ह्यासह, राज्यातील उन्हाळी सोयाबीन बियाणेप्रकरणी सखोल चौकशी करून मदत देऊ, असे आश्वासन महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास दिली.
कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने मंत्रालयात बुधवारी दुपारी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस कृषी विभाग, महाबीजचे सर्व अधिकारी, धनगाव (ता. पलुस) येथील शेतकरी उपस्थित होते.
सांगलीसह अन्य जिल्ह्यांतही यावर्षी महाबीजमार्फत बीजोत्पादन कार्यक्रम आखला होता. यामध्ये हजारो शेतकऱ्यांना केडीएस ७२६ जातीचे बियाणे दिले होते. ते सर्व बियाणे सदोष असल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. तसेच उत्पन्न ही कमी प्रमाणात आले. यासंदर्भात धनगाव येथील शेतकऱ्यांनी आवाज उठविला होता. दरम्यान कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी या सोयाबीन पिकांची पाहणी करून यासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले होते.
निकृष्ट उन्हाळी सोयाबीन वाणामुळे झालेल्या नुकसानीची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली जाईल. याबाबत सखोल अभ्यास करून समिती शासनाकडे अहवाल सादर करील व त्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. यावेळी प्रदीप साळुंखे, शरद साळुंखे, धनगावचे सरपंच सतपाल साळुंखे, दीपक भोसले आदी उपस्थित होते.