यंदा आटपाडीचा आमदार करुया : सर्वपक्षीय बैठकीत निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 09:36 PM2019-10-03T21:36:29+5:302019-10-03T21:39:05+5:30

आटपाडी तालुक्याचा आमदार करण्यासाठी सर्वानुमते उमेदवार निवडण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आटपाडीत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना अमरसिंह देशमुख म्हणाले, तालुक्यात कुठे समाजमंदिरांना निधी दिला म्हणजे विकास झाला का? तालुक्याच्या मूळ प्रश्नांवर काम केले जाते का?

 Let's make MLA this year: determination in all-party meetings | यंदा आटपाडीचा आमदार करुया : सर्वपक्षीय बैठकीत निर्धार

आटपाडी येथे गुरुवारी तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी मार्गदर्शन केले.

Next
ठळक मुद्देकॉँग्रेस, रिपाइं, भारिप बहुजन महासंघ, ‘स्वाभिमानी’, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र

आटपाडी : यंदा ठरवूया... आटपाडीचाच आमदार झाला पाहिजे. १९९५ ची पुनरावृत्ती घडली पाहिजे. किती दिवस अन्याय सोसायचा? खानापूरच्या नेत्याचं ओझं किती दिवस डोक्यावर घ्यायचं? आटपाडी तालुक्याचा सुपुत्रच जो आटपाडीचा स्वाभिमान बनेल, त्यांना आमदार करुया, अशा भावना तालुक्यातील सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केल्या.

आटपाडी तालुक्याचा आमदार करण्यासाठी सर्वानुमते उमेदवार निवडण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आटपाडीत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना अमरसिंह देशमुख म्हणाले, तालुक्यात कुठे समाजमंदिरांना निधी दिला म्हणजे विकास झाला का? तालुक्याच्या मूळ प्रश्नांवर काम केले जाते का? खानापूर मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून फक्त एकदा राजेंद्रअण्णा देशमुख आमदार झाले. सध्या टेंभूचे पाणी नाझरेला चाललेय. कुणाचे नियंत्रण नाही. पैसे असूनसुद्धा पाण्यासाठी कुणाच्या तरी दारात बसावे लागते, हे लाजिरवाणे आहे. त्यासाठी आटपाडी तालुक्याचा आमदार होणे गरजेचे आहे. सर्वानुमते उमेदवार ठरवा, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख म्हणाले, आपण आणि स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते भारत पाटील यांनी आटपाडीचा आमदार होण्यासाठी बैठक घ्यावी, असे आवाहन केले होते. तालुक्यातील आमदार होण्यासाठी आपली पाठिंबा देण्याची भूमिका आहे. जो या तालुक्याचा सुपुत्र आहे, तो कधीच या विचारांशी प्रतारणा करणार नाही. राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींशी विनंती करून पाठिंब्याची भूमिका घेऊ.

काँग्रेसचे सरचिटणीस राजाराम देशमुख म्हणाले, १९९५ पासून तालुक्यात विधानसभा आणि विधानपरिषद आमदाराचा दुष्काळ आहे. तालुक्यातील सर्व प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक घेऊन सक्षम उमेदवार देऊ. पण कोणत्याही परिस्थितीत आटपाडीचा आमदार होणार म्हणजे होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बैठकीत अ‍ॅड. सचिन सातपुते, श्रावण वाक्षे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात, भारिप बहुजन महासंघाचे नेते अरुण वाघमारे, काँग्रेसचे युवा अध्यक्ष राहुल गायकवाड, अशोक लवटे, स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते भारत पाटील, विनायकराव मासाळ, अजित चव्हाण, प्रा. डॉ. अंकुश कोळेकर, प्रणव गुरव, पी. जी. बाड, अशोक माळी, मोहन खरात, सावंता पुसावळे यांची भाषणे झाली.

बैठकीस वसंतराव गायकवाड, शिवराम मासाळ, भगवानराव मोरे, भाऊसाहेब गायकवाड, सभापती हर्षवर्धन देशमुख, महिपती पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

जय आटपाडी तालुका!
बैठकीत अनेक वक्त्यांनी आटपाडी तालुक्यावरील अन्यायाचा पाढा वाचला. अनेक कार्यकर्त्यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवून पोलिसांकडून कारवाई करुन त्रास दिल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी ‘जय आटपाडी तालुका!’ अशी प्रथम घोषणा दिली. त्यानंतर सर्व वक्त्यांनी आटपाडी तालुक्याची अस्मिता जागृत करत आटपाडी तालुक्याच्या जय-जयकाराच्या घोषणा दिल्या.

अनिल बाबर यांच्यावर आरोप
आटपाडी तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याची धनगाव येथून पाणी उपसा करणारी योजना आपण सादर केल्यापासून एक वर्षाच्या आत मंजूर झाली. निविदा निघाली. २२५ कि.मी. जलवाहिनीचे काम झाले. पण गेले दीड वर्ष केवळ सव्वा कि. मी. अंतराचे काम थांबलेय. पैसे पडून आहेत. मला अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्यावर विधानसभा निवडणूक होईपर्यंत आटपाडीला पाणी देऊ नका, म्हणून दबाव आणला आहे, असा आरोप अमरसिंह देशमुख यांनी आ. अनिल बाबर यांच्यावर केला.

 

Web Title:  Let's make MLA this year: determination in all-party meetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.