जतला आता आठवड्यातून दोन दिवस पाणी

By admin | Published: April 24, 2016 11:07 PM2016-04-24T23:07:23+5:302016-04-24T23:52:48+5:30

नगरपालिकेचा निर्णय : बिरनाळ तलावाने गाठला तळ; २५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध

Let's now water for two days a week | जतला आता आठवड्यातून दोन दिवस पाणी

जतला आता आठवड्यातून दोन दिवस पाणी

Next

जयवंत आदाटे -- जत --जत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बिरनाळ (ता. जत) येथील साठवण तलावात फक्त वीस दशलक्ष घनफूट इतका अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे नगरपालिकेने पाणी पुरवठ्यात कपात केली आहे. आठवड्यातून तीन दिवस होणारा पाणी पुरवठा बंद करून फक्त दोन दिवस पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना यापुढील काळात तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
जत शहराची लोकसंख्या सुमारे ३८ हजार इतकी आहे. गौसिद्ध साठवण तलाव, यल्लम्मादेवी विहीर व बिरनाळ साठवण तलाव येथून शहराला पाणी पुरवठा केला जात होता. त्यापैकी जानेवारी महिन्यातच गौसिद्ध तलाव कोरडा ठणठणीत झाला आहे, तर एक एप्रिलपासून यल्लम्मादेवी विहिरीतील पाणी उद्भव बंद झाला आहे. त्यामुळे याचा ताण बिरनाळ पाणी पुरवठा यंत्रणेवर पडू लागला आहे. बिरनाळ जलशुद्धीकरण केंद्रातून पाईपलाईनद्वारे यल्लम्मा विहिरीत पाणी नेऊन शहराच्या दक्षिण भागातील नागरिकांना सध्या पाणी पुरवठा केला जात आहे.
बिरनाळ तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. तलावातील मृतसंचय पाणी पातळी व गाळ याचा ताळमेळ घातला, तर फक्त पंचवीस-तीस दिवस पुरेल इतका पाणीसाठा तलावात शिल्लक आहे. सध्या बिरनाळ तलावातून बारा हजार लिटर क्षमतेच्या टॅँकरद्वारे तालुक्यातील देवनाळ, मेंढेगिरी, बसर्गी, उमराणी, सिंदूर, बिळूर, खोजनवाडी, अचकनहळ्ळी, उंटवाडी, रेवनाळ, रावळगुुंडवाडी, बनाळी, अमृतवाडी आदी चौदा गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे तलावातील पाण्याची पातळी वेगाने खाली जात आहे. कडक ऊन, अहोरात्र होणारा पाणी उपसा, बाष्पीभवन यामुळे येत्या पंधरा-वीस दिवसातच तलावातील पाणीसाठा संपुष्टात येईल, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
बिरनाळ तलावात म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेच्या कालव्यामधून आलेले पाणी सोडण्यात येते. सध्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे. पाटबंधारे विभागाने कुंभारी व शेगाव तलावात काही प्रमाणात पाणी सोडून तेथील पाणी पुरवठा बंद केला आहे. पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तलावात पाणी न सोडता शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या तलावात पाणी सोडल्यामुळे जत शहरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना, पाणी जवळ असूनही करावा लागत आहे. पाटबंधारे विभागाने बिरनाळ तलाव वगळून पुढे पाणी का सोडले आहे?. पिण्याच्या पाण्याचेही राजकारण केले जात आहे काय? याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगरपरिषद विरोधी गटनेते परशुराम मोरे यांनी केली आहे.
पाटबंधारे विभागाने बिरनाळ तलावात तात्काळ पाणी सोडणे आवश्यक आहे. जर पाणी सोडले नाही, तर नागरिक स्वत: आक्रमक होऊन पाण्याचे टॅँकर अडवतील अथवा म्हैसाळ कालवा फोडून पाणी स्वत: घेतील, असा इशारा जत नगरपरिषद नगराध्यक्ष इकबाल गवंडी व उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे यांनी दिला आहे.


पाटबंधारे विभागाचा चुकीचा निर्णय
तिप्पेहळ्ळी तलावात सध्या पाणी सोडले जात आहे. कुंभारी व तिप्पेहळ्ळी तलावादरम्यान बिरनाळ साठवण तलाव आहे. पाटबंधारे विभागाने चुकीचा निर्णय घेऊन, बिरनाळऐवजी तिप्पेहळ्ळी तलावात पाणी सोडले आहे. तिप्पेहळ्ळी तलावातील पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही, फक्त शेतीसाठी वापरले जाते.

Web Title: Let's now water for two days a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.