खुंदलापूरच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:21 AM2021-01-15T04:21:54+5:302021-01-15T04:21:54+5:30
कोकरूड : खुंदलापूरच्या पुनर्वसनासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊन हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी ...
कोकरूड : खुंदलापूरच्या पुनर्वसनासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊन हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिले. खुंदलापूरच्या पुनर्वसनासंदर्भात माजी आमदार शिवाजीराव नाईक व सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्यामध्ये बैठक झाली.
शिराळा तालुक्यातील खुंदलापूर-धनगरवाडा येथील लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेली २५ वर्षे प्रलंबित आहे. पुनर्वसनाचा आराखडा बनवण्याचे काम व संकलनाचे काम पूर्ण करून आधी जमिनीचा ताबा व भरपाईची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना देऊन पुनर्वसन करावे, खुंदलापूरसाठी कडेगाव तालुक्यातील येतगाव व जानाईवाडीसाठी घोगाव (ता. पलूस) येथील जमिनीची पाहणी केली; पण त्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करून पुनर्वसनाचा प्रश्नही मार्गी लावावा, अशी विनंती माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
जिल्हधिकारी अभिजित चौधरी यांनी शिराळाचे तहसीलदार व प्रांताधिकारी यांना बोलावून संबंधित गावांच्या पुनर्वसनाची माहिती संकलित करून लवकरच त्यासंदर्भात नागरिकांची बैठक घेऊन पुनर्वसनाचा प्रश्नही मार्गी लावू, असे आश्वासन दिले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी कदम, प्रांताधिकारी नागेश पाटील, शिराळाचे तहसीलदार गणेश शिंदे, मणदूरचे सरपंच वसंत पाटील, खुंदलापूरचे माजी सरपंच तुकाराम गावडे, भागोजी डोईफोडे, बाबूराव डोईफोडे, विठ्ठल डोईफोडे, धोंडिबा डोईफोडे, टकू डोईफोडे, मारुती गिरीवाले, रामचंद्र जाधव, मोहन पाटील आदीसह गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो-१३कोकरुड१
फोटो ओळ : सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात चांदोली अभयारण्यातील गावांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी जिल्हधिकारी अभिजित चौधरी यांना माहिती दिली.