सरकारच्या मानगुटीवर बसून असंघटित कामगारांचे प्रश्न सोडवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:19 AM2021-02-05T07:19:14+5:302021-02-05T07:19:14+5:30
इस्लामपूर : कोरोनाकाळात शेतकरी व कामगारांचे हाल झाले. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री घरी बंदिस्त होऊन बसले. त्यांच्या मंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही. ...
इस्लामपूर : कोरोनाकाळात शेतकरी व कामगारांचे हाल झाले. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री घरी बंदिस्त होऊन बसले. त्यांच्या मंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही. आमच्या सरकारने कामगारांसाठी लागू केलेली योजनाही बंद करून टाकली असून या सरकारच्या मानगुटीवर बसून असंघटित कामगारांचे प्रश्न सोडविणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी केले.
येथे बहुजन कामगार संघ व रयत क्रांती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित असंघटित कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आ. सदाभाऊ खोत, आ. गोपिचंद पडळकर, माजी आ. भगवानराव साळुंखे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक, पृथ्वीराज पवार, जयराज पाटील, सागर खोत, संस्थापक संदीप पाटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटील म्हणाले, मोदी सरकारने शेतकरी व कामगार वर्गासाठी अनेक योजना लागू केल्या. तीन कोटी लोकांना पक्की घरे दिली. केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात अनेकांना कोट्यवधींची पॅकेज दिली. मात्र या राज्य सरकारने कोणतेही ठोस पॅकेज जाहीर केले नाही.
आ. सदाभाऊ खोत म्हणाले, दिल्लीतील हिंसाचारात सामील असणारे शेतकरी नाहीत. ते दर देशद्रोही आहेत, कोरोनाच्या काळात राज्य सरकरने असंघटित कामगारांसाठी कोणतीही मदत केली नाही, जी मदत झाली ती फक्त केंद्र सरकारने दिली आहे, राज्य सरकारने कामगारांचे प्रश्न सोडवावेत.
आ. पडळकर म्हणाले, असंघटित कामगारांच्या लढ्यासाठी मी व आ. सदाभाऊ खोत एक पाऊल पुढे असू. सरकारकडे कोट्यवधी रुपये पडून आहेत.
पाटोळे म्हणाले, कामगारांसाठी आणलेल्या योजनामंध्ये सत्ताधारी राज्यकर्त्यांनी खोडा घालण्याचे काम केले. मात्र आ. खोत यांच्या मार्गदर्शनाखाली हा खोडा मी बाजूला केला.
यावेळी अमित कदम, विक्रम पाटील, स्वरूप पाटील, लालासाहेब पाटील, मोहसीन पटवेकर, सुधीर कांबळे, नंदकुमार पाटील, विनायक जाधव, बजरंग भोसले, अरूण गावडे, प्रदीप साठे उपस्थित होते.
बहुजन कामगार संघाचे प्रदेशाध्यक्ष सलिम सय्यद यांनी स्वागत केले. प्रदीप साठे यांनी आभार मानले.
चौकट...
अण्णा भाऊंना भारतरत्न देण्याची मागणी
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी श्रमिकांची चळवळ उभा केली. शाहिरीतून त्यांनी शोषितांच्या मागण्या मांडल्या. कष्टकरी व श्रमिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अण्णा भाऊंना भारतरत्न देण्याची मागणी आ. सदाभाऊ खोत यांनी केली.
फोटो ओळी :
इस्लामपूर येथे असंघटित कामगारांच्या मेळाव्यात आ. चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आ. सदाभाऊ खोत, आ. गोपिचंद पडळकर, राहुल महाडिक, माजी आ. भगवानराव साळुंखे, सागर खोत, संदीप पाटोळे उपस्थित होते.