भ्रष्टाचारमुक्त, राजकारण विरहित कारभार करु : कोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 12:45 AM2020-01-19T00:45:51+5:302020-01-19T00:48:39+5:30
पाणी, शिक्षण आणि आरोग्य हे मूलभूत तीन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या आहेत.- प्राजक्ता कोरे
अशोक डोंबाळे ।
सांगलीजिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रयत्न असफल झाले. अध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडीत भाजपने निर्विवाद वर्चस्व ठेवत सत्ता कायम राखली. अध्यक्षपदाची संधी प्राजक्ता कोरे यांना मिळाली. याबद्दल त्यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न : जिल्ह्याच्या विकासासाठी तुमचे व्हिजन काय आहे?
उत्तर : पावणेतीन वर्षे जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे कामकाजाची पूर्णपणे माहिती आहे. सामान्य जनतेच्यादृष्टीने शिक्षण, आरोग्य आणि पाणी हे तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत. हेच सोडविण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरु आहेत. शंभर टक्के शाळा ई-लर्निंग करणार असून जिल्हा नियोजनमधून साडेचार कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. २००७ पासून शाळांना खेळाचे साहित्यच मिळाले नसल्यामुळे ग्रामीण भागातील मुलांची कुचंबणा होत होती. म्हणून स्वीय निधीतून तात्काळ १५ लाखांचे खेळाचे साहित्य देणार आहे. आरोग्य केंद्रामध्येही मूलभूत सुविधा देऊन तेथील आरोग्य सेवा सक्षम करणार आहे. या योजना राबवितांना भ्रष्टाचारमुक्त कारभार करणार आहे. शासनाच्या योजनांचा लाभ देतांना राजकारणही येऊ देणार नाही.
प्रश्न : शासनाने जिल्हा परिषदेचे अनेक अधिकार कमी करुन पंख छाटले आहेत. निधीची टंचाई आहे, यावर तुम्ही काय करणार आहे?
उत्तर : राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांमार्फत शासनाकडे शिक्षक बदल्यांसह कृषी विभागाच्या योजना पुन्हा जि. प.कडे देण्याची मागणी करणार आहे. जि. प. सभेतही तसा ठराव करुन शासनाकडे पाठविणार आहे. स्वीय निधी वाढविण्यासाठी प्रयत्न असून, वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषदेलाही मिळावा, अशीही मागणी शासनाकडे करणार आहे. जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागा विकसित करणे, करांची विविध मार्गाने गळती होत असून ती रोखूनही उत्पन्न वाढू शकते. त्यादृष्टीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
- गुणवत्ता वाढविणार...
जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तेचे शिक्षक असून, गणवेश, पोषण आहारही शासन देत आहे. तरीही येथील पटसंख्या कमी होत आहे, ही चिंतेची बाब आहे. हे कुणासाठीच भूषणावह नाही. यामुळे शिक्षक निश्चितच आम्हाला शाळांची गुणवत्ता वाढीसाठी मदत करतील, असेही कोरे यांनी स्पष्ट केले.
- गाव तिथे स्पर्धा परीक्षा केंद्र
ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवंत असूनही त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी योग्य पुस्तके उपलब्ध होत नाहीत. काही विद्यार्थ्यांना परिस्थितीमुळे महागडी पुस्तके खरेदी करता येत नाहीत. म्हणूनच जिल्हा परिषदेतर्फे गाव तिथे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. एमपीएससी, युपीएस परीक्षेसाठी लागणारी पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देणार आहे. यासाठी स्वीय निधीतून पैशाची तरतूद करणार आहे, असेही कोरे यांनी सांगितले.