खाती गोठविण्यासाठी बँकांना पत्रे
By admin | Published: October 31, 2014 11:45 PM2014-10-31T23:45:44+5:302014-10-31T23:47:14+5:30
पतसंस्था घोटाळा : पाटीलच्या जामिनावर आज निर्णय
सांगली : जिल्हा परिषदेच्या आवारातील अण्णासाहेब पाटील जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेमध्ये सुमारे १२ कोटी २६ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संस्थेचा संस्थापक-अध्यक्ष अण्णासाहेब पाटील (रा. सांगली) याच्यासह पाचजणांची बँकेतील खाती गोठविण्यासाठी शंभरहून अधिक बँकांना लेखी पत्र पाठवून सूचना केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांनी दिली. दरम्यान, पाटीलने केलेल्या अटकपूर्व जामिन अर्जावर उद्या (शनिवार) निर्णय होणार आहे.
अण्णासाहेब पाटील याच्यासह लिपिक गणपती शिंदे, अकौंटंट बाळासाहेब पाटील, लिपिक अजितकुमार पाटील (रा. नांद्रे, ता. मिरज), शिपाई विष्णू माळी (रा. गव्हर्मेंट कॉलनी, सांगली) या पाचजणांविरुद्ध चार दिवसांपूर्वी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेची कारवाई टाळण्यासाठी पाटीलने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. त्यावर आज होणारा निर्णय न्यायालयाने उद्यापर्यंत (शनिवार) पुढे ढकलला आहे.
पाटील व त्याच्या सहकाऱ्यांनी २००३ ते ३१ मार्च २०१० पर्यंत पतसंस्थेतून बोगस कर्जे उचलली. त्याचबरोबर ठेवीदारांच्या ठेवी परस्पर हडप करून एकूण १२ कोटी २६ लाख ७३ हजार २९६ रुपयांचा अपहार केल्याचा त्यांच्याविरुद्ध आरोप ठेवण्यात आला आहे.
संशयितांनी अपहारातील रक्कम ही बँकेत ठेवली असण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिसांनी जिल्ह्यातील शंभरहून अधिक बँका व काही पतसंस्थांशी लेखी पत्राद्वारे संपर्क साधला आहे. संशयितांची बँक खाती असतील तर तातडीने गोठवून त्याची माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे. पाचही संशयितांच्या घरांवर पोलिसांनी छापे टाकले. मात्र गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागल्याने संशयित घराला कुलूप ठोकून पसार झाले आहेत. (प्रतिनिधी)