अग्रणी नदीने ओलांडली धोक्याची पातळी; लोणारवाडीचा पूल गेला वाहून : अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 01:00 AM2019-10-11T01:00:28+5:302019-10-11T01:02:34+5:30
सध्या या पुलावरून पाणी वाहत असल्याने गुरुवारी दिवसभर वाहतूक थांबली होती. देशिंग-कवठेमहांकाळ वाहतूकही ठप्प झाली होती. मोरगाव पुलावर पाण्याचा प्रवाह वेगवान होता.
कवठेमहांकाळ / शिरढोण : अग्रणी नदीला आठवड्यात दुसऱ्यांदा पूर आला. कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव, मोरगाव, अग्रण धुळगाव, मळणगाव येथील पूल पाण्याखाली गेले आहेत, तर लोणारवाडी येथील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या २५ वर्षांत प्रथमच अग्रणीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
अग्रणीला गेल्या रविवारी पूर आला होता, त्यामध्ये मोरगाव येथील पुलावरून दोघे वाहून गेले होते. गुरुवारी हिंगणगाव येथे दोन दुचाकी वाहून गेल्या. लोणारवाडी येथे गावाबाहेर असलेला खोतवाडी (कर्नाटक हद्द) येथे जाणारा मातीने बांधलेला पूल पाण्याच्या गतीने वाहून गेला. हा पूल वर्षापूर्वीच बांधण्यात आला होता. कवठेमहांकाळ ते सलगरे मार्गावर हिंगणगाव येथे पूल आहे. या पुलावरून मोठी वाहतूक सुरू असते. या परिसरातील सलगरे, कोगनोळी, कुकटोळी, करोली टी. या परिसरातील लोक सकाळी कवठेमहांकाळ येथे नोकरी, मजुरीसाठी, तर विद्यार्थी शाळा, महाविद्यालयांत जातात. सध्या या पुलावरून पाणी वाहत असल्याने गुरुवारी दिवसभर वाहतूक थांबली होती. देशिंग-कवठेमहांकाळ वाहतूकही ठप्प झाली होती. मोरगाव पुलावर पाण्याचा प्रवाह वेगवान होता.
अग्रण धुळगाव ते करोली टीकडे जाणारा रस्ताही बंद झाला आहे. तेथील पूलही पाण्याखाली गेला आहे. आठ दिवसात पावसाने दमदार हजेरी लावल्याने परिसरातील तलाव भरले असून, ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत.
दरम्यान, लोणारवाडीच्या सरपंच रूपाली सातपुते म्हणाल्या, लोणारवाडीकडे जाणारा पूल पाण्याखाली गेल्याने कर्नाटक हद्दीतील खोतवाडीचा संपर्क तुटला आहे. खोतवाडीतील नागरिकांचे सर्व व्यवहार लोणारवाडीत चालतात. हे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.
अग्रणीच्या पुराने गव्हाणचा पूल पाण्याखाली
गव्हाण : गव्हाण (ता. तासगाव) येथे बुधवारी रात्री आठच्या सुमारास गव्हाण, वज्रचौंडे, सावळज, सिद्धेवाडी या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने अग्रणी नदी बुधवारी मध्यरात्रीपासून दुथडी भरून वाहत आहे. गव्हाणमधील अग्रणी नदीच्या पुलावरून तीन ते चार फूट पाणी वाहू लागल्याने गुरुवारी दिवसभर गव्हाण-मणेराजुरी रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. दरम्यान, या पुलावरून वाहून जाणाºया युवकास वाचविण्यात नागरिकांना यश आले. सावळज, सिद्धेवाडी परिसरात सुमारे दोन तास अक्षरश: धो-धो पाऊस पडला. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. ऐन पावसाळ्यात या भागात पावसाने पाठ फिरवली होती. या भागातील सर्वात मोठा असणारा सिद्धेवाडी तलाव कोरडा ठणठणीत होता. काही ठिकाणी तर पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत होती; परंतु परतीच्या पावसाने कृपा केल्याने सिद्धेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. गुरुवारी दिवसभर पुलावरील पाण्याची पातळी कमी झाली नाही. गावातील तोफिक मणेर हा युवक दुचाकीवरून पूल पार करीत असताना त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. तो दुचाकीसह पुलावरून वाहून गेला, परंतु प्रसंगावधान राखून गावातील रोहन गुरव, अक्षय टोकले, अमोल पाटील या युवकांनी नदीत उड्या घेतल्या व तोफिकचे प्राण वाचवले. तोफिकला पोहता येत नव्हते. दिवसभर पाण्याची पातळी कमी न झाल्याने वाहतूक पूर्णपणे बंद होती. शालेय विद्यार्थ्यांचे व प्रवासी वर्गाचे हाल झाले.