खासगी प्रज्ञाशोध परीक्षेतून ‘आटपाडी’ची मुक्ती
By admin | Published: July 16, 2015 11:14 PM2015-07-16T23:14:35+5:302015-07-16T23:14:35+5:30
आर्थिक लुबाडणूकही थांबली : जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यात बंदी घालण्याची गरज--लोकमतचा प्रभाव
अविनाश बाड- आटपाडी -पालकांना आणि विद्यार्थ्यांना राज्यात आणि देशात क्रमांक आल्याच्या भूलथापा देऊन त्यांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या खासगी प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षांंच्या जंजाळातून आटपाडी तालुका मुक्त झाला. संपूर्ण जिल्हा कधी मुक्त होणार?, असा प्रश्न आता जिल्ह्यातील शिक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.
शासनाचा शिक्षण विभाग आणि राज्य परीक्षा परिषदेची कसलीही मान्यता नसताना अनेकखासगी संस्था इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या माथी कमी किमतीची पुस्तके मारून, तसेच परीक्षा फीच्या नावाखाली पालकांची दिवसाढवळ्या आर्थिक फसवणूक करीत आहेत. विशेष म्हणजे काही मुख्याध्यापक आणि शिक्षकच कमिशनच्या हव्यासापोटी विद्यार्थी आणि पालकांना फसवित आहेत. ‘लोकमत’ने या गंभीर प्रकरणावर आटपाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने बंदी आणल्याची गुड न्यूज दिली.
या वृत्तामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ माजली. वॉटस् अॅपवरील शिक्षकांच्या प्रत्येक समूहावर ही बातमी झळकत असून, यावर अनेक प्रामाणिक गुरुजींनी सडेतोड मते व्यक्त केली आहेत. पण ज्यांचे हात टक्केवारीने बरबटले आहेत, असे शिक्षक यावर मत व्यक्त करण्यास नकार देत आहेत.
एका शिक्षकाने तर सर्व गुरुजींना या परीक्षेविषयी माहिती देणारी व्यक्ती प्रथम कमिशन किती सांगते? याचा अर्थ काय? नेमकी जनमानसातील आपली प्रतिमा गुरुजींची आहे की दलालाची? असा रोखठोक प्रश्न उपस्थित केला आहे.
आटपाडीने धडा दिला, आता तो सर्वांनी घेतला पाहिजे. शिष्यवृत्ती, नवोदय आणि शासकीय प्रज्ञाशोध असताना, खासगी स्पर्धा परीक्षांचा आटापिटा कशाला? या परीक्षा नव्हत्या तेव्हा सर्वांची बुद्धी काय मंदगतीने वाढत होती काय? या परीक्षांचे पेव, त्यांचे प्रवेश, त्यांच्या परीक्षा पद्धती, त्यांचे पर्यवेक्षण, त्यांचे निकाल या सर्वांबाबत नीट माहिती घेतली असता, अशा परीक्षांतील पोकळपणा आणि पालकांच्या डोक्यावर चढलेले भूत नक्की उतरेल.
निकालानंतर केलेला अनाठायी गाजावाजा आणि हा सर्वच प्रकार म्हणजे, उथळ पाण्याला खळखळाट फार, अशी वस्तुुस्थिती आहे. यामध्ये यशापेक्षा जास्त चमकोगिरीच करून गुरुजींसह पालक समाजाच्या आणि स्वत:च्याही डोळ्यात धूळफेक करून घेत आहेत, अशा प्रतिक्रिया अनेक शिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.
शासनाचा अभ्यासक्रम हा अतिशय तज्ज्ञांनी बनविलेला असतो. तेव्हा शिक्षकमित्रांनी अभ्यासक्रम आधी पूर्ण करावा. चमचेगिरी, एजंटगिरी, कमिशन घेणाऱ्या काही शिक्षकांमुळे सर्वच शिक्षक बदनाम होत आहेत, याचा खासगी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या माथी मारताना हुजरेगिरी आणि लाचारी पत्करणाऱ्या शिक्षकांनी विचार करावा. तरच समाजात शिक्षकांचा सन्मान वाढेल, अशी शिक्षकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी प्रतिक्रिया एका शिक्षकाने व्यक्त केली आहे. तसेच खासगी मालक असणाऱ्या स्पर्धा परीक्षा चालकांनी परीक्षांचे दुकानच काढले आहे. त्यामधून ते पैसे मिळवितात. छोटी मुले ही त्यांची गिऱ्हाईके बनतात. पालक काही शिक्षकांच्या भूूलथापांना बळी पडतात. अशा परीक्षा फक्त काही शिक्षक आणि चालकांनाच फायदेशीर आहेत, अशी एक बोलकी प्रतिक्रिया देण्यात आली आहे.