कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रंथालये वाचकांअभावी ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 04:45 PM2019-09-11T16:45:09+5:302019-09-11T16:46:30+5:30
महाविद्यालयीन तरुणवर्ग मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियात अडकल्यामुळे ग्रंथालये ओस पडू लागली आहेत. त्यातच शासनाच्या तोकड्या अनुदानामुळे ग्रंथालयाच्या खर्चाचा मेळ घालताना दमछाक होत आहे. कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यात तर त्याची दाहकता जास्त जाणवत आहे.
जालिंदर शिंदे
घाटनांद्रे : महाविद्यालयीन तरुणवर्ग मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियात अडकल्यामुळे ग्रंथालये ओस पडू लागली आहेत. त्यातच शासनाच्या तोकड्या अनुदानामुळे ग्रंथालयाच्या खर्चाचा मेळ घालताना दमछाक होत आहे. कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यात तर त्याची दाहकता जास्त जाणवत आहे.
शालेय विद्यार्थी, तरुण पिढी ग्रंथालयात फार कमी दिसू लागली आहे. दिसलेच तर चार-दोन वृत्तपत्रे चाळणारेच जास्त आढळतात. स्मार्ट फोनच्या युगात वाचकाविना कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रंथालये ओस पडू लागली आहेत.
पूर्वी शाळांना सुटी लागली की ग्रंथालये हाऊसफुल्ल होत असत. हे चित्र मागे पडून सध्याची पिढी मोबाईलमध्येच गुंतलेली दिसते. त्यांनी वाचनालयांकडे पाठ फिरवली आहे. वाचन संस्कृतीला बळकटी मिळावी व त्यासाठी समृद्ध ग्रंथालयाची निर्मिती व्हावी, यासाठी शासनाकडून निधी दिला जातो. पण तो तोकडा ठरत आहे. दहा टक्के लोकवर्गणीतून निधी गोळा करण्याची परवानगी आहे, पण वाचकांनी ग्रंथालयाकडे पाठ फिरविल्यामुळे लोकवर्गणीतून कसा निधी गोळा करायचा, हा प्रश्नच आहे.
दुष्काळी ग्रामीण भागात तर हे अशक्यप्राय आहे. सध्या शासकीय नियमानुसार अ वर्ग तालुका ग्रंथालयासाठी ३ लाख ८४ हजार रुपये, ह्यबह्ण वर्गासाठी २ लाख ८८ हजार रुपये, क वर्गासाठी ९६ हजार, तर ड वर्गासाठी केवळ ३० हजाराचे शासकीय अनुदान वर्षाकाठी भेटते.
पुस्तके, मासिके, साप्ताहिके, पाक्षिके, वृत्तपत्रे, त्याचबरोबर कपाट, फर्निचर तसेच पगार, इमारत भाडे आदी खर्च या तोकड्या अनुदानातूनच भागवावा लागतो. खर्चाचा मेळ घालताना दमछाक होत आहे. ते चालवणे जिकिरीचे झाले आहे.