परवान्यासाठी सावकारांची तोबा गर्दी

By admin | Published: March 29, 2016 11:27 PM2016-03-29T23:27:31+5:302016-03-30T00:14:55+5:30

जिल्ह्यातील स्थिती : पतसंस्थांच्या चळवळीची उतरती कळा सावकारांच्या पथ्यावर

For the license, the breakdown of the lenders | परवान्यासाठी सावकारांची तोबा गर्दी

परवान्यासाठी सावकारांची तोबा गर्दी

Next

सांगली : सावकारीचा अधिकृत परवाना मिळविण्यासाठी सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होत आहेत. गतवर्षी साडेचारशेच्या घरात असणारी नोंदणीकृत सावकारांची संख्या यावर्षी ५३२ वर गेली आहे. पतसंस्थांची उतरती कळा आणि मोडीत निघालेली चळवळ या सावकारांच्या पथ्यावर पडत असल्याचे चित्र आहे.
कधी शंभरावर असणारी सावकारांची संख्या सहकार चळवळीच्या अधोगतीमुळे आता साडेपाचशेच्या घरात पोहोचली आहे. २००६ नंतर सहकाराच्या आलेखाचे स्तंभ खाली कोसळत गेले आणि ही चळवळ आता जिल्ह्याच्या आर्थिक नकाशावर दुर्बिणीने शोधावी लागत आहे. पतसंस्थांचे पसरलेले जाळे फाटले आणि कुचकामी बनले. त्याचे विपरीत परिणाम अनधिकृत सावकारीच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात दिसू लागले. सहकार पंढरीत सावकारांची दादागिरी वाढली. अनधिकृत सावकारांची संख्या मोठी असतानाच आता अधिकृत सावकारीचा परवाना मिळविण्यासाठी गर्दी होत आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात जवळपास ८० लोकांनी परवान्यांची मागणी केली.
मागणीप्रमाणे छाननी व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर परवाने देण्यात आले. त्यामुळे आता ही संख्या ५३२ वर पोहोचली आहे. सहाशे रुपये परवाना फी आणि उलाढालीवर २ टक्के रक्कम जमा करून परवाने दिले जातात. तरीही सावकारी प्रतिबंधक कायद्यान्वये अशा नोंदणीकृत सावकारांवरील बंधने आता वाढली आहेत. कर्जदाराने जर कर्ज आणि व्याजाचा उल्लेख करून कोणताही व्यवहार केल्यास त्याचा फायदा त्याला होऊ शकतो. शेती, घर किंवा जमीन यांचे व्यवहार सावकारीतून केले जाताना, त्याचा कागदपत्रात उल्लेख करण्याची सतर्कता कर्जदारांनी बाळगली, तर त्यांची जमीन, घर किंवा मालमत्ता परत मिळू शकते. परवाना देताना अनेक बंधनेही आता त्यांच्यावर लादण्यात आली आहेत.
तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख दिलीप सावंत यांनी सावकारांनी गिळंकृत केलेल्या जमिनी परत मिळवून देण्यासाठी सहकार विभागाकडे १६ प्रस्ताव दाखल केले होते.
त्यातील ९ प्रकरणे निकालात काढण्यात आली आहेत. यातील दोन प्रकरणात जमीन परत देण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले होते. त्याविरोधात आता उच्च न्यालयात अपील दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)

पत्रकारांचाही समावेश
सावकारीचा परवाना मागणाऱ्यांच्या यादीत यापूर्वी मोठे उद्योजक, व्यापारी, राजकारणी यांचा सर्वाधिक समावेश होता. आता काही पत्रकारांनीही सावकारीचे परवाने घेतल्याची बाब समोर आली आहे.


सावकारी व्याजदर
कर्जदार दर
बिगरशेती (तारणी)९ टक्के
बिगरशेती (विनातारणी)१५ टक्के
शेती (तारणी) १२ टक्के
शेती (विनातारणी)१८ टक्के

Web Title: For the license, the breakdown of the lenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.