जीवनशिक्षण देणारे कुरणे सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:24 AM2021-02-14T04:24:09+5:302021-02-14T04:24:09+5:30
इन्ट्रो गेल्या पाव शतकाच्या शैक्षणिक वाटचालीत डॉ. लहू कुरणे सरांनी हजारो उच्चशिक्षित विद्यार्थी घडविले. अनेकजण देश-विदेशांत गेले. आज रस्त्यावरून ...
इन्ट्रो
गेल्या पाव शतकाच्या शैक्षणिक वाटचालीत डॉ. लहू कुरणे सरांनी हजारो उच्चशिक्षित विद्यार्थी घडविले. अनेकजण देश-विदेशांत गेले. आज रस्त्यावरून धावणारी एखादी लाल दिव्याची गाडी अचानक थांबते आणि त्यातून एखादा आयएएस अधिकारी उतरून कुरणे सरांची पायधूळ घेतो तेव्हा त्यांच्या कृत्यकृत्यतेचा बँक बॅलन्स कैकपटींनी वाढतो. आष्टा येथील राजाराम शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक म्हणून सेवा करणार्या डॉ. लहू कुरणे सरांच्या या यशामागे आहेत निरक्षर आई-वडिलांचे संस्कार, पत्नी धनश्रीची साथ आणि तुकोबांच्या गाथेतील जीवनानुभव !
लहानगे लहू आणि अंकुश पाटी-पेन्सिल घेऊन शाळेत निघाले की आई म्हणायची, ‘आज शाळा राहू दे, रानात चला, सोबतीला कुणी नाही’. मग दोघांच्या शाळेला खाडं पडायचं. शाळा चुकली तरी त्यांच्या शिक्षणात खंड मात्र पडायचा नाही. निरक्षर आई आपल्या ऐकीव व अनुभवांच्या ज्ञानानुसार त्यांना बाहेरचे जग समजावून सांगायची. पिचलेल्या-गांजलेल्यांच्या कहाण्या सांगायची. शिक्षणाने आभाळाएवढी उंची गाठलेल्यांचा मोठेपणा सांगायची. रानात आणि संध्याकाळी घरातही हे व्यावहारिक शिक्षण सुरूच राहायचे. वडिलांनी उपाशीपोटी केलेले अपार कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या गोष्टी सांगायची. यातूनच लहू आणि अंकुशच्या बालसुलभ सुपीक मनाच्या पठारावर मानवतेचे, कणवाळूपणाचे बीजारोपण होत राहिले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे मनावर बिंबले. ते शिकत गेले. त्यातील लहू फारच पुढे गेला. पोस्ट ग्रॅज्युएशन केले. मराठी, समाजशास्त्र, इतिहास आणि राज्यशास्त्र या चार विषयांत पदव्युत्तर पदव्या मिळविल्या. मराठी विषयात डॉक्टरेटही मिळविली. इतक्या उच्च शिक्षणानंतरही पाय मातीतच राहतील याचे भान आईच्या संस्कारांमुळे पदोपदी राहिले. आष्टा येथील राजाराम शिक्षण संस्थेत मोठमोठ्या जबाबदार्या सांभाळताना आईने दिलेली शिदोरी वेळोवेळी पाठीशी राहिली. संकटकाळी आत्मविश्वासाचे बळ देत गेली.
वाळवा तालुक्यातील बहादूरवाडीत १९६९ मध्ये लहू आणि अंकुश बापू कुरणे या जुळ्या भावंडांचा जन्म झाला. शिक्षणाचा गंध नसलेल्या आणि मातीत राबण्यातच आयुष्य घालविलेल्या कुरणे कुटुंबासाठी दघांचे जन्म म्हणजे शेतात राबण्यासाठी आणखी चार हात मिळाले हीच भावना होती. पण, लहूचा जन्म मातीत मळण्यासाठी नव्हता हे आई व वडिलांनी त्याच्या लहानपणीच निश्चित केले असावे. लहूनेदेखील आई-वडिलांचे स्वप्न स्वत:च्या नजरेने पाहिले. तो शिकत राहिला. एम.ए.बी.एड. झाला. पीएच.डी.पर्यंत मजल मारली. लहूच्या नावापुढे डॉक्टरेट लागली तेव्हा आई-वडिलांना आकाश ठेंगणे झाले.
पण, खरा प्रवास यापुढेच होता. शिक्षकी पेशात येण्यापूर्वी चरितार्थासाठी मुंबईत जिल्हाधिकारी कार्यालयात काहीकाळ कारकुनी केली. एका खासगी कंपनीतही काम केले; पण त्यात मन रमले नाही. आष्ट्याचे नेते विलासराव शिंदे यांच्या नजरेत हा हिरा भरला. त्यांनी राजाराम शिक्षण संस्थेत घेतले. १९९४ मध्ये सहायक शिक्षक म्हणून रुजू झाले. कुरणे सरांना जगण्याची दिशा आणि ध्येय गवसले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ठाम ध्यानी आलेल्या कुरणे सरांनी विद्यार्थ्यांनाही जीवनशिक्षणाचे धडे द्यायला सुरुवात केली. आज संस्थेतील सर्वाधिक विद्यार्थीप्रिय शिक्षकांपैकी कुरणे सर हे एक आहेत.
‘लहानपणी भांगलणीपासून घर सारवण्यापर्यंत सगळीच कामे केलीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व सांगताना कधीच कमी पडलो नाही’... कुरणे सर सांगतात. ‘रानात गुरे वळली, नांगरट केली, नाकातोंडात माती जाईपर्यंत राबलो; त्यामुळे मातीशी नाळ जोडली गेली. विद्यार्थी घडविताना पुस्तकी ज्ञानाबरोबरच जीवनशिक्षणदेखील आवश्यक असल्याचे जाणवले. शहराच्या तुलनेत ग्रामीण विद्यार्थी कमी पडू नयेत यासाठी व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला. सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच ही वेळ माझ्यासाठी कधीच नव्हती. माझ्यातील शिक्षक चोवीस तास जागा राहिला. गेली १० वर्षे मुख्याध्यापक व केंद्र संयोजक म्हणून प्रशासनाचे आणि अध्यापनाचे कार्य करीत आहे’. विषयतज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पाया पक्का असल्याचा फायदा होतो. अभ्यासूपण अध्यापनकौशल्य, श्रोत्यांचा कल जाणून त्यांना खेळवून ठेवण्याचे कसब, दाखले व उदाहरणांसह व्यक्त होणारी वक्तव्ये यामुळे सर छाप पाडून जातात. उच्च शिक्षणाचा वृथा अभिमान न बाळगता पहिलीपासून पदवीपर्यंत कोठेही शिकविण्याची तयारी ठेवतात. हा प्रवास स्वत:ला सिद्ध करण्याचा असल्याचे मानतात. ते म्हणतात, ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राच्या विद्यार्थ्यांचे वेळी-अवेळी फोन येतात; पण एकही कॉल मी चुकवत नाही. कुरणे सरांना वेळ नसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण अडखळले असे होऊ नये ही त्यामागची माझी प्रामाणिक भावना आहे’. इंग्रजीचे अतिक्रमण आणि तंत्रज्ञानाचा वापर यामुळे मायमराठी कोठेतरी कोपर्यात पडते की काय असे वाटण्याच्या काळात कुरणे सरांचा मराठी भाषेचा निग्रह कायम आहे. मराठीतील गोडवा विद्यार्थ्यांपुढे मांडण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू असतो.
कुरणे सरांची कार्यक्षमता पाहून संस्थेने वारणावती शाळेची जबाबदारी सोपविली. चांदोली धरणाचा दुर्गम भाग आणि शिक्षणासाठी पायपीट करणारी मुले हे वारणावती शाळेचे चित्र होते. मातीच्या गोळ्यांना घडविण्याचा छंद असणार्या कुरणे सरांनी हे आव्हानदेखील स्वीकारले. गेल्या दोन वर्षांत शाळेला सरांनी गुणवत्तेत आघाडी मिळवून दिली आहे.
या संपूर्ण वाटचालीत पत्नी धनश्रीची साथ मोलाची ठरल्याचे सर सांगतात. लग्नावेळी बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या धनश्रीला सरांनी नंतर शिक्षणासाठी उद्युक्त केले. त्यासाठी घरही सोडले. एमएबीएडनंतर त्यादेखील राजाराम शिक्षण संस्थेतच रुजू झाल्या. विद्यार्थी घडविण्याच्या ध्यासापायी सर अहोरात्र घराबाहेर फिरतात, तेव्हा नोकरी व घर सांभाळण्याची दुहेरी जबाबदारी धनश्री मॅडम सांभाळतात. मुलगा हेमंतकुमार पोस्ट ग्रॅज्युएशननंतर प्रशासकीय सेवेसाठी प्रयत्नशील आहे. आई आणि वडिलांच्या संस्कारांमुळे स्वयं प्रयत्नवादी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या विचारांचा खूपच मोठा प्रभाव असल्याचे सांगताना डॉ. कुरणे सर स्वत:चे जीवनही याच ध्यासातून साकारण्याचा प्रयत्न करतात. सरांचे असंख्य विद्यार्थी देश-विदेशांत आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवताहेत. संपूर्ण भारतासह अमेरिका-इंग्लंडपासून दुबई-ऑस्ट्रेलियापर्यंत ठिकठिकाणी चांगल्या पदांवर आहेत. हा माझ्या आयुष्याचा बँक बॅलन्स असल्याचा अभिमान ते व्यक्त करतात.
ही निरपेक्ष वृत्ती तुकोबांच्या साहित्यातून सरांना मिळाली. संत साहित्याचा गाढा अभ्यास असणार् या कुरणे सरांच्या वागण्या-बोलण्यात संतांच्या वचनांचा अंगीकार दिसतो. ‘मी फक्त निमित्तमात्र’ या तीन शब्दांत जगण्याच्या एकूण वाटचालीचे वर्णन करतात. कवीमनाच्या कुरणे सरांच्या खात्यावर अडीचशेहून अधिक कवितांची बेगमी आहे. लवकरच त्याचे पुस्तक काढण्याचा मनोदय आहे. अनेक चिंतनपर लेख, दलित साहित्याचे अभ्यासपूर्ण विवेचन, कथा, कादंब?्यांचे परीक्षण याद्वारे साहित्यातही त्यांची अखंड मुशाफिरी सुरू आहे. पीएच.डी. करताना दलित कथातील स्त्री जीवनाचा चिकित्सक अभ्यास त्यांनी केला. त्यातून गवसलेले ज्ञानभांडारही प्रकाशित करणार आहेत.
त्यांच्या या सर्जनशील वाटचालीची दखल डझनभर पुरस्कारांनी घेतली आहे. आदर्श शिक्षक, विद्यारत्न, साहित्यरत्न, आष्टा गौरव, शिक्षक रत्न, समाजरत्न, एज्युकेशन आयकॉन, इंडियन टीचर्स आयडॉल, जीवनगौरव अशा अनेक पुरस्कारांनी सरांची अभ्यासिका भरून गेली आहे. त्यातून त्यांच्यातला सर्जनशील शिक्षक जागोजागी प्रतित झाल्याविना राहत नाही.
ही सारी वाटचाल विलासराव शिंदे साहेबांमुळेच शक्य झाल्याचे नम्रपणे सांगतात. त्यांच्या पश्चात संस्थेचे चेअरमन मा. वैभवदादा आणि विशालभाऊंनीनीही सरांवर विश्वास टाकला आहे. शिक्षकी पेशातून सुसंस्कृत माणूस आणि समाज घडविण्याची कृतार्थता मोठे समाधान देऊन जाते ही त्यांची भावना आहे.
----------------------