सांगलीतील दुहेरी खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा, जिल्हा न्यायालयाचा निकाल
By शरद जाधव | Published: October 19, 2022 08:35 PM2022-10-19T20:35:30+5:302022-10-19T20:35:39+5:30
मारहाणीचा जाब विचारण्यावरून घटना
सांगली: शहरातील रामनगर परिसरात मारहाणीचा जाब विचारण्यास गेलेल्या दोन तरुणांचा धारदार हत्याराने वार करून, खून केल्याप्रकरणी आरोपीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सैफुनसाब ऊर्फ अली मक्तुमसाब मकाशी (वय २८, रा. रामनगर, कोल्हापूर रोड, सांगली) असे आरोपीचे नाव आहे. राहुल मल्लेश बंड्यागोळ व विकी ऊर्फ धनवान राजेंद्र टिंगरे अशी मृतांची नावे आहेत. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.
खटल्याची माहिती अशी की, २ जानेवारी २०१६ रोजी शिवराज सत्याळ हा आपला भाऊ अमोल याला आणण्यासाठी बसस्थानकाकडे निघाला होता. यावेळी डॉ. सपकाळ यांच्या रुग्णालयासमोर आरोपी मकाशी याने त्याची दुचाकी सत्याळ याला आडवी मारली व त्यानंतर त्याला मारहाण केली. यानंतर मारहाण का केली याची विचारणा करण्यासाठी उदय सत्याळ, शिवराज सत्याळ हे निघाले होते. एवढ्यात मृत राहुल बंड्यागोळ व विकी टिंगरे हे भेटले. त्यानंतर चौघेही एका पानपट्टीजवळ असलेल्या मकाशी याला विचारणा करण्यासाठी गेले.मारहाणीबाबत त्याला जाब विचारला असता, मकाशी याने शिवीगाळ सुरू केली. यावेळी तिथे असलेले समीर सनदी, राेहित हिंगमिरे व मेेहबूब मुल्ला हे आरोपी मकाशी याच्या मदतीसाठी आले व त्यांनी सत्याळ यांना मारहाण सुरू केली.
यानंतर मकाशी दुचाकीकडे पळत गेला व त्याने पिशवीत ठेवलेली दोन हत्यारे घेऊन विकी टिंगरेवर वार केले. यावेळी राहुल बंड्यागोळ याला पकडून ठेवण्यात आले होते. त्यानंतर मकाशी याने राहुलवरही वार केले. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला होता. दोघांचा खून करून मकाशी पळून जात असताना, त्याला हरीश शिंदे याने पकडण्याचा प्रयत्न केला असता, मकाशी याने शिंदे याच्यावरही हत्याराने वार केला होता.
या प्रकरणात सात साक्षीदार तपासण्यात आले. यात जखमी हरीश शिंदे, शिवराज सत्याळ, डॉ. चंद्रा देसाई, डॉ. सुनील पाटील, शिवाजी पाटील, तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्या साक्षी ग्राह्य मानण्यात आल्या. पैरवी कक्षातील वंदना मिसाळ, शरद राडे, गणेश वाघ यांचे सहकार्य मिळाले.