मित्राच्या खुनातील आरोपीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:30 PM2019-04-18T23:30:33+5:302019-04-18T23:30:38+5:30
सांगली : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने परशुराम रोहिदास कट्टीमणी (वय २६) या मित्राचा कुºहाडीने हल्ला करुन निर्घृण खून ...
सांगली : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने परशुराम रोहिदास कट्टीमणी (वय २६) या मित्राचा कुºहाडीने हल्ला करुन निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी जितेंद्र ऊर्फ प्रदीप दिलीप तायडे (२५, रा. संजयनगर झोपडपट्टी) यास दोषी धरुन जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्रन्यायाधीश भालचंद्र देबडवार यांनी गुरुवारी हा निकाल दिला.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, मृत कट्टीमणी व तायडे हे दोघे जीवलग मित्र होते. ते संजयनगर झोपडपट्टीत राहत होते. तायडे यास दारुचे व्यसन होते. त्याने कट्टीमणी यासही दारुचे व्यसन लावले होते. १३ आॅक्टोबर २०१३ रोजी रात्री साडेदहा वाजता कट्टीमणी हा त्याचा भाऊ भगवान व अन्य मित्रांसोबत मिरजेत मंगळवार पेठेतील चर्चजवळ दुर्गामाता देवीची विसर्जन मिरवणूक पाहण्यास गेले होते. तिथे तायडे आला. त्याने कट्टीमणी यास बाजूला घेतले. ‘माझे एकाशी भांडण झाले आहे. आपण जरा दारु पिण्यासाठी जाऊया, नाही तर मला दारु पिण्यास पैसे दे’, असे तो म्हणाला. कट्टीमणी याने ‘तुझे तू बघ, माझ्याकडे पैसे नाहीत’, असे सांगितले. याचा तायडेला खूप राग आला. त्याने ‘मी तुला कित्येकवेळा माझ्या पैशाने दारु पाजली आहे. आज माझ्याकडे पैसे नाहीत. मला पैसे दिले नाहीस तर लक्षात ठेव’, असे म्हणून तो निघून गेला.
दुर्गामाता देवीची मिरवणूक झाल्यानंतर कट्टीमणी हा घराजवळ आला. तेवढ्यात पाठीमागून तायडे कुºहाड घेऊन आला. त्याने बेसावध असलेल्या कट्टमणीच्या डोक्यात कुºहाडीने हल्ला केला. तो जोरात ओरडून रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर त्याने त्याच्या गळ्यावर हल्ला केला. त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून भाऊ भगवान धावत आला. त्याने तायडेला रोखण्याचा प्रयत्न केला. पण तायडेने भगवानवरही हल्ला केला. परिसरातील लोक जमा झाल्यानंतर तायडे पळून गेला होता. कट्टमणी जागीच मरण पावला होता.
याप्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे यांनी तपास केला होता. सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील अरविंद देश्मुख यांनी काम पाहिले. देशमुख यांनी सहा साक्षीदार तपासले. यामध्ये मृत कट्टीमणीचा भाऊ भगवान, वैद्यकीय अधिकारी राहुल कांबळे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
जमावाला धमकी देत पसार
कट्टीमणी याचा खून केल्यानंतर संजयनगर झोपडपट्टीतील रहिवासी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी दाखल झाले होते. ते कट्टमणीला उपचारासाठी नेण्यास पुढे येताच तायडे याने जमावाला कुºहाडीच्या धाकाने धमकी दिली. ‘कट्टीमणीला कोणी मदत करायची नाही, कोण पुढे आले तर त्याला सोडणार नाही’, अशी धमकी देत तो पसार झाला होता. त्याला दुसऱ्यादिवशी अटक करण्यात यश आले होते.