चिकुर्डे येथे बापाचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:37 AM2020-12-30T04:37:03+5:302020-12-30T04:37:03+5:30
इस्लामपूर : चिकुर्डे (ता. वाळवा) येथे घरी झोपलेल्या वयोवृद्ध वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांचा खून करणाऱ्या मुलास येथील ...
इस्लामपूर : चिकुर्डे (ता. वाळवा) येथे घरी झोपलेल्या वयोवृद्ध वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांचा खून करणाऱ्या मुलास येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पहिले न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी खुनाच्या गुन्ह्यात दोषी धरून जन्मठेप व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न दिल्यास त्याला सहा महिन्यांचा साधा कारावास भाेगावा लागणार आहे.
लक्ष्मण हरी पाटील-वाघमारे (वय ३०, रा. चिकुर्डे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. हरी कोंडीबा पाटील-वाघमारे (८१) या वयोवृद्ध वडिलांचा त्याने खून केला हाेता. खुनाची ही घटना १९ जुलै २०१९ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास टाकळी वसाहतीमधील घरात घडली होती. याबाबत पोलीस पाटील सुधीर विजय कांबळे यांनी कुरळप पोलिसात फिर्याद दिली होती.
चिकुर्डे येथील टाकळी वसाहतीत हरी पाटील हे पत्नी आणि मुलासह राहत होते. हरी पाटील यांना २०१७ मध्ये अर्धांगवायू झाल्याने ते घरीच असत. मुलगा लक्ष्मण हा कोणताही कामधंदा करत नव्हता. त्याला दारूचे व्यसन होते. दारूसाठी वरचे वर पैसे मागून आई-वडिलांशी तो भांडत होता. १९ जुलैच्या रात्री हरी पाटील हे झोपले होते. त्यावेळी लक्ष्मण याने म्हैस विकलेल्या पैशाच्या कारणावरून भांडण काढले. यावेळी लक्ष्मण याने रागाच्या भरात वडील हरी पाटील यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांचा खून केला. या खटल्याची सुनावणी न्या. मुनघाटे यांच्यासमोर झाली. सहायक सरकारी वकील विनय कुलकर्णी यांनी सरकार पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासले. त्यातील तपास अधिकारी अरविंद काटे, वैद्यकीय अधिकारी आणि स्वत:च्या मुलाविरुद्ध आईने दिलेली साक्ष ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी लक्ष्मण यास जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शितोळे, पोलीस हवालदार संदीप पाटील, शरद पाटील यांनी सरकार पक्षाला खटल्याच्या कामकाजात मदत केली.
फोटो- २९१२२०२०-आयएसएलएम- लक्ष्मण पाटील-वाघमारे