इस्लामपुरातील व्यापारी संकुलात जीव गुदमरून टाकणारी दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:36 AM2021-06-16T04:36:49+5:302021-06-16T04:36:49+5:30
इस्लामपूर येथील मुख्य भाजी मंडईतील व्यापारी संकुलाच्या प्रवेशद्वारात पसरलेले घाणीचे दृश्य. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील मुख्य ...
इस्लामपूर येथील मुख्य भाजी मंडईतील व्यापारी संकुलाच्या प्रवेशद्वारात पसरलेले घाणीचे दृश्य.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील मुख्य भाजी बाजार मंडईत असणाऱ्या नगरपालिकेच्या व्यापारी संकुलाच्या प्रवेशद्वारात घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य कित्येक महिन्यांपासून तळ ठोकून बसले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाचे या दुर्गंधीकडे कधीच लक्ष जात नाही, हीच मोठी खेदजनक बाब आहे.
या संकुलात वित्तीय संस्था, विमा कार्यालय, शैक्षणिक संस्थेचे कार्यालय, छोटे-मोठे व्यापारी असल्याने या परिसरात नागरिकांची दिवसभर वर्दळ असते. या नागरिकांना या प्रवेशद्वारात पाय ठेवण्याचीदेखील इच्छा होत नाही. इतक्या तीव्र स्वरूपाची दुर्गंधी पसरलेली असते. याठिकाणी उघड्यावरच भटकंती करणाऱ्या कुटुंबांचा दैनंदिन कुटुंब व्यवहार याच प्रवेशद्वारात राजरोस सुरू असतो. उघड्यावर पडलेले अन्न तिथेच होणारे लहान-मोठ्याचे नैसर्गिक विधी यामुळे हा संपूर्ण परिसर दुर्गंधीने ग्रासलेला असतो.
या व्यापारी संकुलात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाक मुठीत पकडूनही जीव गुदमरून टाकणाऱ्या दुर्गंधीचा प्रत्येक क्षणी सामना करावा लागतो. शहराच्या मध्यवस्तीत असणारा हा परिसर आणि त्यातील व्यापारी या दुर्गंधीने त्रासून गेले आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत येथील कचऱ्याचा उठाव केला जातो; मात्र दुर्गंधी हटविण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना होत नसल्याने व्यापाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.