नयनरम्य आतषबाजीत उजळले कवठेएकंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:16 PM2017-10-01T23:16:52+5:302017-10-01T23:16:52+5:30
प्रदीप पोतदार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कवठेएकंद : येथे श्री सिद्धराजाचा पालखी सोहळा व त्यानिमित्ताने साकारण्यात येणारे शोभेचे दारूकाम उत्साहात, भक्तीपूर्ण वातावरणात पार पडले. आसमंत उजळून टाकणाºया नानाविध प्रकारच्या नयनरम्य आतषबाजीच्या वर्षावात तब्बल १३ तास पालखी सोहळा रंगला. प्रशासन व यात्रा कमिटीने चोख व्यवस्था केली, तर ग्रामस्थ व दारू शोभा मंडळांकडून संयोजनाची चोखपणे जबाबदारी बजावली. त्यामुळे शांततेत व सुरक्षित सोहळा पार पडला.
रात्री ९ वा. श्री मंदिरात पूजा-अर्चा होऊन हजारो औटांच्या सलामीने सोहळ्यास सुरुवात झाली. शिलंगण चौकात चव्हाण-पाटील कट्टा येथे दसºयाचे सोने आपटा पूजन करण्यात आले. पालखीचे सर्व मानकरी, सेवेकरी, गुरव, पुजारी आदी भाविकांच्या उपस्थितीत ग्रामप्रदक्षिणेस प्रारंभ झाला. श्री सिद्धराज महाराज आणि श्री बिरदेव महालिंगरायाचा पालखी सोहळा नेत्रदीपक आतषबाजीची सलामी घेत पुढे पुढे सरकत होता.
श्री सिध्दराजाच्या पांढरीत भाविकांची जमलेली गर्दी, गर्दीतून उमटणारा हर हरचा गजर, अवकाशात होणाºया सोनेरी ठिणग्यांचा वर्षाव अशा उत्साही आणि जल्लोषी वातावरणात कवठेएकंद (ता. तासगाव) येथे विजया दशमीचा सीमोल्लंघन सोहळा परंपरा, भक्ती आणि कलेचा संगम आतषबाजीच्या माध्यमातून साकारण्यात आला. सोहळ्यात विद्युत रोषणाईने सजवलेला अश्व, आरती-दिवटी, छत्र-चामर, पोषाख व शस्त्रधारी सेवेकरी अशा दिमाखात दोन्ही पालख्या ‘हर हर’च्या जयघोषात हजारो भाविकांच्या साक्षीने ‘भक्ती आणि कलेचा’अनोखा मिलाफ आतषबाजीच्या नानाविध प्रकारांतून अनुभवण्यास येत होता. पारंपरिक दारूकामाबरोबरच नव्याने ताज्या घडामोडींवरील आतषबाजी करण्यासाठी मंडळांनी सहभाग घेतला. मुजावर फ्रेंड सर्कलने ‘पेट्रोल दरवाढीबद्दल नाराजी व्यक्त करीत ‘पेट्रोल पंपावर महागाईचा भडका’ ही आतषबाजी साकारली. आझाद मंडळाचा ‘पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा’ हा देखावा लक्षवेधी ठरला. तसेच फुगडी, मोर, दांडपट्टा, बुरूज, वेस, कागदी शिंगटे, सूर्य पान, झाडे अशा नेत्रदीपक पारंपरिक दारूकामाबरोबरच गोल्डनची वेस, सिध्दिविनायकचा ‘सूर्य व आॅलिम्पिक फायर शो, औटांची बरसात यशस्वी ठरली. ‘आकाशदीपचे सोनेरी ठिणग्यांचे झाडकाम, नवरंग, बसवेश्वर, सप्तरंगचे रंगीत चक्रे, कोरे अड्डयाची लाकडी शिंगटे’, तर ए वन मंडळाकडून श्री सिध्दराज महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन, तर आतषबाजीचा ‘डिजिटल कारंजा’ साकारण्यात आला. सुसंघ मंडळ, नवरंग, बसवेश्वर मंडळाकडून सप्तमुखी, पंचमुखी झाडकाम लक्षवेधी करण्यात आले. हिंदमाता मंडळाचे पांढºया झाडकामाने डोळे दिपवले. अग्निपुत्र अजिंक्यतारा मंडळाच्या ‘कागदी शिंगटांचा दरारा’ही खास लक्षवेधी ठरला. आ. सुमनताई पाटील यांनी देवालयात उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले.