जिल्ह्यातील अंधांच्या दुनियेत ‘ब्रेल’चा प्रकाश : जगण्याला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 11:46 PM2020-01-03T23:46:11+5:302020-01-03T23:48:14+5:30

जिल्ह्यात पूर्णत: व अंशत: अंध असलेल्या लोकांची संख्या १ हजाराच्या घरात आहे. शालेय शिक्षण घेत असलेल्या अंध मुलांची संख्या १२0 च्या घरात असून शिक्षणाच्या माध्यमातून करिअरच्या वाटा गवसलेल्या अंध लोकांची संख्या सुमारे चारशेच्या घरात असून, यातील सुमारे ६0 लोक शासकीय सेवेत आहेत.

The light of 'Braille' in the world of the blind in the district | जिल्ह्यातील अंधांच्या दुनियेत ‘ब्रेल’चा प्रकाश : जगण्याला बळ

जिल्ह्यातील अंधांच्या दुनियेत ‘ब्रेल’चा प्रकाश : जगण्याला बळ

googlenewsNext
ठळक मुद्दे ब्रेलर, डिजिप्लेअरसाठी शासकीय मदतीची गरज; अंधांची संख्या हजारापेक्षा अधिक

अविनाश कोळी ।
सांगली : ब्रेलच्या आधारावर शिक्षणाचा पाया भक्कम करून सामान्य लोकांप्रमाणे जीवनाचा प्रवास करणाऱ्या अंधांच्या दुनियेत आता अत्याधुनिक साधनांद्वारेही प्रकाश पडत आहे. ब्रेलच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे गिरविल्यानंतर संगणक, मोबाईच्या माध्यमातून अत्याधुनिक यंत्रणांद्वारे करिअर घडविणाºया जिल्ह्यातील अंधांना आजही ब्रेल पद्धतीचाच सर्वाधिक आधार लाभत आहे. म्हणूनच ब्रेलर (अंधांसाठीचा टाईपरायटर), डिजिप्लेअर (संगणकीय सॉफ्टवेअर) यासारख्या महागड्या यंत्रांच्या खरेदीसाठी शासनाच्या मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात पूर्णत: व अंशत: अंध असलेल्या लोकांची संख्या १ हजाराच्या घरात आहे. शालेय शिक्षण घेत असलेल्या अंध मुलांची संख्या १२0 च्या घरात असून शिक्षणाच्या माध्यमातून करिअरच्या वाटा गवसलेल्या अंध लोकांची संख्या सुमारे चारशेच्या घरात असून, यातील सुमारे ६0 लोक शासकीय सेवेत आहेत. मिरजेतील अंध तरुणांच्या एका समूहाने आॅर्केस्ट्राही उभारला आहे. अशा प्रत्येक पातळीवर अंध लोकांनी दृष्टी असलेल्या लोकांहून अधिक चांगली कामगिरी केल्याचे दिसत आहे. सामाजिक संस्था, शासन यांच्या माध्यमातून त्यांना मदतीचा आधार असला तरी, त्यांच्यासाठी ब-याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. त्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.

यामध्ये अंध लोकांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तके, साहित्य, ब्रेलर अशा गोष्टींसाठी अनुदान किंवा मदतीची गरज आहे. ब्रेलरची किंमत सध्या बाजारात ३0 हजार रुपयांच्या घरात आहे. इतकी मोठी रक्कम अंध लोकांना परवडणारी नाही. त्यामुळे यासाठी ठोस मदतीची गरज आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक अंध संगणकावरही काम करताना दिसत आहेत. डिजिप्लेअर या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संगणकावर उमटणाºया गोष्टींना संवाद स्वरुपात अंधांना समजतात. त्यामुळे या यंत्रणेचाही मोठा उपयोग त्यांना होत आहे.

 

  • ब्रेल दिनाचे महत्त्व

स्वत: अंध असूनही फ्रान्सच्या लुई ब्रेल यांनी जगातील सर्व अंधांसाठी ब्रेल लिपीचा शोध लावला. अंधांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पाडणाऱ्या ब्रेल यांचा ४ जानेवारी हा जन्मदिन. त्यामुळेच या दिवशी जागतिक ब्रेल दिन साजरा केला जातो. कागदावर छिद्रांच्या साहाय्याने उमटणारी अक्षरे आणि त्यावर बोटांच्या स्पर्शातून होत असलेले आकलन, हे या ब्रेल पद्धतीचे वैशिष्ट्य असून आधुनिक युगातही ही ब्रेल लिपी अंधांसाठी लाभकारी ठरत आहे.

 

  • ६० जण शासकीय सेवेत

शिक्षणाच्या माध्यमातून करिअरच्या वाटा गवसलेल्या अंध लोकांची संख्या सुमारे चारशेच्या घरात असून, यातील सुमारे ६0 लोक शासकीय सेवेत आहेत.

 

  • आमदार, खासदार फंडातून मदत शक्य

आमदार, खासदारांचा फंड अंध, अपंगांच्या वैयक्तिक लाभासाठीही वापरता येतो. त्यामुळे ब्रेलर व अन्य साहित्य खरेदीसाठी या फंडातून अंधांसाठी थोडी तरतूद करावी, अशी अपेक्षा जिल्ह्यातील अंधांकडून व्यक्त केली जात आहे.

 

ब्रेल लिपीतील पुस्तकांची छपाई ही अधिक खर्चिक असते. शैक्षणिक पुस्तकांबरोबरच अंधांना साहित्यिक रुचीही असते. त्यामुळे कथा, कादंबऱ्या, कविता, चरित्रपर लेखनासह विविध प्रकारच्या पुस्तकांचा आस्वाद अंधांना घेण्यासाठी अशा पुस्तक निर्मितीस शासनाने आर्थिक बळ दिले पाहिजे. सध्या मुंबई आणि नाशिकला अशी पुस्तके मिळतात. प्रत्येक जिल्ह्यात ती मिळायला हवीत. ब्रेलर व अन्य साहित्यासाठीही अनुदान हवे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ब्रेल लिपीतील मतदान यंत्र उपलब्ध करून शासनाने अंधांना मुख्य प्रवाहात आणले. त्याप्रमाणे आता अन्य गोष्टींसाठीही मदत करावी, म्हणजे अंधांचे जीवन समृद्ध होईल.
- यशवंत जाधव, सल्लागार, सर्वधर्मसमभाव अंध, अपंग संस्था, मिरज


जागतिक ब्रेल
दिन विशेष

Web Title: The light of 'Braille' in the world of the blind in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.