आसंगी तुर्कमध्ये वीज पडून छप्पर जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:27 AM2021-05-08T04:27:54+5:302021-05-08T04:27:54+5:30
फोटो ओळ : आसंगी तुर्क (ता. जत) येथे भीमू दऱ्याप्पा दळवाई यांच्या छप्परवजा घरावर वीज पडून छप्पर जळून खाक ...
फोटो ओळ : आसंगी तुर्क (ता. जत) येथे भीमू दऱ्याप्पा दळवाई यांच्या छप्परवजा घरावर वीज पडून छप्पर जळून खाक झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : आसंगी तुर्क (ता. जत) येथील भीमू दऱ्याप्पा दळवाई (वय ७०) यांच्या राहत्या छप्परवजा घरावर वीज पडून आग लागली. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता घडली. यामध्ये ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. छप्पर, रोख २० हजार रुपये, संसारोपयोगी साहित्य, धान्य जळून खाक झाले. घरात कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही.
आसंगी तुर्क गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर घोणसगी रस्त्याकडे भीमू दऱ्याप्पा दळवाई व त्याची पत्नी राहतात. दुपार साडेचार वाजता पाऊस पडत असताना विजेचा कडकडाट झाला. काही कळायच्या आत छपरावर वीज पडली. वीज पडल्यानंतर आग लागली. जोरदार वारा व पालापाचोळाचे छप्पर असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे आग विझवता आली नाही.
आगीत संसारोपयोगी साहित्य, ज्वारी, गहू, रोख २० हजार रुपये जळून खाक झाले. घरात कोण नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही.
चाैकट
दैव बलवत्तर
भीमू दऱ्याप्पा दळवाई कामानिमित्त गावात गेले होते. पत्नी सखुबाई दळवाई आजारी असल्याने पांडोझरी (ता. जत) येथील मुलगीकडे गुरुवारी गेली होती. ती घरी असताना तिच्याकडे नातवंडे येतात. पाऊस असताना घरात थांबून राहिले असते. त्यावेळी मोठा अनर्थ झाला असता. दैव बलवत्तर म्हणून वाचले.
चाैकट
बोकड विक्रीचे पैसे जळाले
भीमू दळवाई यांचा पशुपालनाचा व्यवसाय आहे. बोकडाची विक्री करून २० हजार रुपये ठेवलेले होते. जळून खाक झाले आहे.
तलाठी डी.वाय. कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.