शहरात दिवे बंद, साहित्य मिळेना!
By admin | Published: January 15, 2015 10:48 PM2015-01-15T22:48:38+5:302015-01-15T23:22:18+5:30
स्थायी सभेत संताप : कर्मचारी अन्य विभागाकडे; सदस्यांचा आरोप
सांगली : महापालिकेच्या विद्युत विभागातील सावळ्यागोंधळाच्या कारभारावर आज स्थायी समितीच्या सभेत वादळी चर्चा झाली. विद्युत विभागाकडील दहा कर्मचारी इतर विभागात काम करीत आहेत. दिवाबत्ती दुरुस्तीसाठी कर्मचारीच मिळत नाहीत. शहरातील अनेक भाग अंधारात आहेत. आस्थापनेवरील कर्मचारी बसून असतात. त्यातच साहित्य खरेदीच्या ठेकेदाराला आॅर्डर न दिल्याने त्याने पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे साहित्यही मिळत नाही, अशा शब्दात सदस्यांनी हल्ला चढविला.
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती संजय मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत राष्ट्रवादीचे विष्णू माने, शेडजी मोहिते यांनी विद्युत विभागाच्या अनागोंदी कारभारावर हल्लाबोल केला. माने म्हणाले की, विद्युत विभागाकडे ३५ वायरमन व ४१ हेल्पर आहेत. त्यापैकी दहाजण इतर विभागात काम करीत आहेत. आस्थापनेवरील वायरमन व हेल्पर कामच करीत नाही. ते नुसते बसून असतात. मानधनावरील कर्मचारी काम करतात, पण तेही आता टाळाटाळ करीत आहेत. साहित्य खरेदीच्या निविदेला मंजुरी मिळाली असली तरी, प्रशासनाने अद्याप ठेकेदाराला आॅर्डर दिलेली नाही. त्यामुळे त्याने साहित्याचा पुरवठा केलेला नाही. त्यात विद्युत विभागाचे सर्व साहित्य सांगलीत असते. कुपवाड व मिरजेच्या कर्मचाऱ्यांना साहित्य आणण्यासाठी सांगलीत यावे लागते. त्यात बराच वेळ जातो. त्यासाठी प्रत्येक प्रभाग समिती व दोन प्रभागात एक वायरमन व हेल्पर अशी समान वाटणी करावी. तसेच साहित्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सहायक आयुक्तांवर द्यावी, अशी मागणी केली. सभापती मेंढे यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत, इतर विभागांकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची विद्युत विभागात बदली करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले.
मोबाईल टॉवर व एटीएमवरील छत्र्यांबाबत प्रशासनाकडून माहिती लपविली जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला. सभापती मेंढे यांनी, याबाबत सदस्यांना माहिती व्हावी, न्यायालयाच्या आदेशाची कल्पना यावी, यासाठी आयुक्तांसमवेत नगररचनाचे अधिकारी, पॅनेलवरील वकील व स्थायी सदस्यांची संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. (प्रतिनिधी)