फॉक्सकॉन'प्रमाणे महाराष्ट्रातील आणखीन एक प्रकल्प गुजरातला जाणार?; नुसतीच घोषणा, कार्यवाही शून्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 01:46 PM2022-09-22T13:46:54+5:302022-09-22T13:47:59+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या तीन ते चार वर्षापासून सातत्याने घोषणा करीत आहेत
महेश देसाई
शिरढोण: दुष्काळी भागातील बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी रांजणी ता. कवठेमहांकाळ येथे ड्रायपोर्ट उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या तीन ते चार वर्षापासून सातत्याने करीत आहेत. मात्र, ड्रायपोर्ट उभारणीसाठी भू-संपादनाची प्रक्रियाच अद्याप सुरु झालेली नाही. रांजणीचे ड्रायपोर्ट कधी होणार? की महाराष्ट्रातील अन्य प्रकल्प व फॉक्सकॉन कंपनीप्रमाणे ड्रायपोर्टही गुजरातला पळवले जाणार? अशी शंका आता दुष्काळी भागातील जनता उपस्थित करीत आहेत.
केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेले हे ड्रायपोर्ट सुरुवातीला रांजणी येथील ३७ हेक्टर खासगी जमीन आणि ९१ हेक्टर शासकीय जमीनीवर प्रस्तावित होते. यासाठी भूनिवड समितीने १४ ऑगस्ट २०१८ ला रांजणी येथे भेट देऊन स्थळपाहणी केली होती. शेळी - मेंढी विकास महामंडळाची जागा ही जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टने सूचित केलेल्या जागेलगत नाही. प्रक्षेत्र रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर आहे. तर जागेवर महामंडळाचे मेष पैदास केंद्र कार्यान्वित आहे. शिवाय जागेच्या भू-संपादनास शेळी - मेंढी विकास महामंडळाची संमती नाही. या कारणास्तव या जागेचा प्रस्ताव रद्द करावा असा अहवाल या भू-निवड समितीने सादर केल्याने शेळी-मेंढी विकास महामंडळाच्या जागेवर ड्रायपोर्ट उभारणीचा प्रस्ताव बारगळला.
यानंतर रांजणी येथील गट नंबर १८१५ ते १८२७, १८३० 'अ' व 'ब' आणि १८३१ मधील एकूण १०७ एकर क्षेत्रावर ड्रायपोर्ट उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर क्षेत्राचे ७/१२ उतारे प्रशासनाने प्राप्त करुन घेतलेले आहेत.या क्षेत्राचे मालक असलेल्या ६० खातेदारांना भू-संपादनाची प्राथमिक नोटीसा पाठवा.
या शेतक-यांची बैठक बोलवा, त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यासंदर्भात चर्चा करा असे आदेश प्रशासनास देण्यात आले. परंतू याबाबत कोणती कार्यवाही प्रशासनाकडून झाली नाही. त्यामुळे गेल्या चार वर्षापासून ड्रायपोर्ट उभारणीचे काम रखडलेलेच आहे.
गडकरी यांचे आश्वासन
मार्च २०२२ ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नविन पुणे - बंगळूर महामार्ग बनवणार असल्याची घोषणा केली. याचबरोबर महाराष्ट्र शासन आणि जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट यांच्या सांमजस्य करारानुसार सांगली जिल्ह्यातील रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथील ड्रायपोर्ट उभारणीचे काम लवकर सुरु होणार असल्याची पुंगी पुन्हा एकदा वाजवली होती.
चार वर्षे केवळ घोषणाच
नवीन पुणे-बंगळूर महामार्गासाठी सर्वेक्षण करण्याचे काम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या हैदराबाद आणि बंगळूर कार्यालयाने सुरु केलेले आहे. प्रस्तावित पुणे - बेंगळूरु महामार्गासाठी मोजणी करुन खुणा करण्याचे काम सुरु झाले आहे. परंतु यापूर्वी ड्रायपोर्ट म्हणून प्रचलित असलेल्या आणि आता लॉजिस्टिक पार्क असे बारसे झालेल्या रांजणी येथील कामाचा प्रस्ताव मात्र पुढे सरकायलाच तयार नाही. चार वर्षामध्ये अनेक वेळेला ड्रायपोर्ट उभारणीची घोषणा होऊनही अजून ड्रायपोर्टसाठी लागणाऱ्या जागेचाच पत्ता नसेल तर हे ड्रायपोर्ट उभा राहणार की नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.