सांगली जिल्ह्यातील पाच पंचायत समितीत कमळ फुलले
By admin | Published: March 14, 2017 06:55 PM2017-03-14T18:55:36+5:302017-03-14T18:55:36+5:30
तीन ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता : खानापुरात शिवसेना, शिराळ्यात दोन्ही काँग्रेसचा झेंडा
सांगली जिल्ह्यातील पाच पंचायत समितीत कमळ फुलले
तीन ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता : खानापुरात शिवसेना, शिराळ्यात दोन्ही काँग्रेसचा झेंडा
सांगली : जिल्ह्यातील दहा पंचायत समितींच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी मंगळवारी पार पडल्या. आटपाडी, पलूस, कडेगाव, जत आणि मिरज या पाच पंचायत समितीत भाजपचे कमळ फुलले. मिरज पंचायत समितीत अपक्षाने भाजपला बळ दिल्याने सभापती आणि उपसभापती पदे पदरात पाडून घेतली. जतमध्ये भाजपने काँग्रेसच्या नाराज गटाला बरोबर घेऊन सत्ता मिळविली. वाळवा, तासगाव आणि कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीने, तर शिराळ्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने गड कायम राखले. खानापूर पंचायत समितीत प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकला.
मिरज आणि जत पंचायत समितीत सत्तेसाठी भाजपकडे काठावरचे बहुमत होते. या कारणांनी निवडीपूर्वी राजकीय हालचाली गतिमान झाल्या होत्या. भाजपची आटपाडी, पलूस, कडेगाव, जत आणि मिरज या पाच पंचायत समितींमध्ये सत्ता मिळविण्याची गणितं यशस्वी झाली. मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत नाट्यमय घडामोडी घडल्या. मिरजेत भाजप ११, काँग्रेस सात, राष्ट्रवादी दोन, अपक्ष एक, स्वाभिमानी शेतकरी संघटना एक असे पक्षीय बलाबल आहे. सभापती पदासाठी भाजपकडून जनाबाई पाटील, तर काँग्रेसच्या पूनम कोळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पाटील यांना १२, तर कोळी यांना १० मते मिळाली. भाजपला अपक्ष एरंडोली गणातील शालन भोई यांनी बळ दिल्याने सभापतीपदी जनाबाई पाटील यांची वर्णी लागली. उपसभापतीसाठी काकासाहेब धामणे (भाजप), अशोक मोहिते (राष्ट्रवादी), तर काँग्रेसकडून रंगराव जाधव यांचा अर्ज दाखल झाला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीत एकमत न झाल्याने काँग्रेसने सातही मते भाजपच्या पारड्यात टाकली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपला साथ दिली. त्यामुळे उपसभापती धामणे यांना २०, तर मोहिते यांना केवळ दोन मतांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसचे जाधव यांनी स्वतचे मतही भाजपला दिल्याचे स्पष्ट झाले.
जत पंचायत समितीमध्ये भाजपकडे काठावरचे बहुमत होते. अठरापैकी नऊ जागा त्यांना मिळाल्या आहेत. काँग्रेसला ७, वसंतदादा विकास आघाडी आणि जनसुराज्य पक्षाला प्रत्येकी एक जागा आहे. भाजपने काँग्रेसच्या नाराज गटाचे नेते सुरेश शिंदे यांच्याशी समझोता करून वसंतदादा विकास आघाडीचा पाठिंबा मिळविला. त्यामुळे भाजपच्या मंगला जमदाडे सभापती आणि वसंतदादा विकास आघाडीचे शिवाजी शिंदेंची बिनविरोध निवड झाली.
पंचायत समितीचे नूतन सभापती व उपसभापती
मिरज - जनाबाई पाटील (भाजप), काकासाहेब धामणे (भाजप)
जत - मंगल जमदाडे (भाजप), शिवाजी शिंदे (वसंतदादा आघाडी)
पलूस - सीमा मांगलेकर (भाजप), अरुण पवार (राष्ट्रवादी)
कडेगाव - मंदाताई करांडे (भाजप), रवींद्र कांबळे (भाजप)
आटपाडी - हर्षवर्धन देशमुख (भाजप), तानाजी यमगर (भाजप)
वाळवा - सचिन हुलवान (राष्ट्रवादी), नेताजी पाटील (राष्ट्रवादी)
तासगाव - माया एडके (राष्ट्रवादी), संभाजी पाटील (राष्ट्रवादी)
क.महांकाळ - मनोहर पाटील (राष्ट्रवादी), सरिता शिंदे (स्वाभिमानी आघाडी)
शिराळा - मायावती कांबळे (काँग्रेस), सम्राटसिंह नाईक (राष्ट्रवादी)
खानापूर - मनीषा बागल (शिवसेना), बाळासाहेब नलवडे (शिवसेना)