क्षणात जुळल्या ऋणानुबंधाच्या गाठी!
By admin | Published: January 2, 2017 11:31 PM2017-01-02T23:31:51+5:302017-01-02T23:31:51+5:30
अनोखी गळाभेट : इस्लामपूरचे डांगे अन् मध्य प्रदेशातील पाटीदार कुटुंबाचा स्नेह
युनूस शेख ल्ल इस्लामपूर
काही नाती दोन क्षणांच्या भेटीतही दोन जन्म पुरेल इतके प्रेम देऊन जातात. अशाच ऋणानुबंधाच्या गाठी साखराळेमधील संपतराव डांगे आणि मध्य प्रदेशातील पानसेमल येथील जयंतीराम पाटीदार यांच्यामध्ये जोडल्या. मध्य प्रदेशात शाळेत शिपाई असलेल्या पाटीदार यांचे ४0 हजार रुपयांचे हरवलेले पाकीट डांगे यांनी परत केले आणि हे बंध जुळले.
डांगे कंपनीच्या कामासाठी मध्य प्रदेशाला गेले होते. या प्रवासात बस खरगोण येथे पोहोचल्यावर डांगे यांनी तेथे अर्धा तास वाट पाहिली. शेवटी ते चालू लागले. तेवढ्यात जयंतीराम पाटीदार समोर आले. त्यांनी डांगे यांना विचारले ‘पानसेमलसे जो बस आई, वो कहाँ रुकी है? असे विचारले. डांगे यांनी बसस्थानकाच्या पलीकडील बाजूला बस थांबल्याचे सांगितले.
पाटीदार तेथून निघाले. मात्र डांगे यांनी त्यांचा हात पकडून ‘क्या काम है, बोलो ना भैय्या,’ असे विचारले, तर पाटीदार काही सांगायला तयार नाहीत. पुन्हा जायला निघाले. मात्र डांगे यांनी हात सोडला नाही. मग पाटीदार यांनी पैशाचे पाकीट हरवल्याचे सांगितले.
डांगे यांनी पाकीट त्यांचेच असल्याची खात्री केली आणि ते त्यांच्या हातात ठेवले. पाटीदार यांच्या डोळ्यातून आनंदाश्रूंच्या धारा लागल्या.
पाटीदार तेथील शाळेत शिपाई आहेत. घराचे बांधकाम आणि मुलीचे लग्न यासाठी त्यांनी ही रक्कम जमा केली होती. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये ऋणानुबंध निर्माण झाले आहेत.
संपकर् ासाठी कोणताच पर्याय नव्हता
संपतराव डांगे इस्लामपूरमधील राजाराम सॉल्व्हेक्समध्ये काम करतात. कंपनीच्या कामानिमित्त ते मध्य प्रदेशात गेले होते. ते पानसेमल-खरगोण बसमधून प्रवास करत होते. त्याच बसमध्ये पाटीदारही होते. खरगोणच्या अलीकडे पाटीदार बसमधून उतरले. मात्र त्याचवेळी त्यांचे ४0 हजार रुपये असलेले पाकीट बसमध्येच पडले. दरम्यान, डांगे यांनी आसन सोडून पाटीदार बसलेल्या पुढच्या आसनावर बॅग ठेवली. बॅग ठेवताना त्यांना पैशाचे पाकीट दिसले नाही. बसल्यावर नजरेस पाकीट पडले. त्यांनी ते पाहिले असता, त्यामध्ये नव्या दोन हजारांच्या २0 नोटा होत्या. पाकिटात पैशांशिवाय, संपर्क करावा, असा एकही कागद नव्हता.