शेतमजूर झाले शेर, शेतकरी सव्वाशेर..!
By admin | Published: December 2, 2014 10:33 PM2014-12-02T22:33:04+5:302014-12-02T23:33:47+5:30
प्रश्न मजुरीचा : इस्लामपुरात संघर्ष टोकाला
अशोक पाटील - इस्लामपूर -सध्या इस्लामपूर आणि परिसरात कामगार आणि शेतमजुरांची टंचाई भासत आहे. त्यामुळे जे शेतमजूर आहेत ते कामावर येताना शेतकऱ्यांवरच शिरजोरी करत आहेत. त्यामुळे उरुण परिसरातील काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मजुरांची कामावर येण्याची वेळ आणि मजुरी निश्चित केली आहे. हे ज्या मजुरांना मान्य असेल त्यांनाच काम दिले जात आहे. त्यामुळे शेतकरी आणि मजुरांतील संघर्ष टोकाला गेला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून उरुण परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतमजुरांना काही अटी घातल्या आहेत. त्यामुळे गेले दोन दिवस या दोघांमध्ये संघर्ष पेटला आहे. सोमवार, दि. १ रोजी संभूआप्पा मठात शेतकरी आणि मजुरांची बैठक झाली. यामध्ये शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडली, तर महागाईच्या काळात मजुरी कशी परवडत नाही, याचा खुलासा महिलांनी धाडसाने केला. त्यामुळे या बैठकीत मोठा गोंधळ उडाला होता.
सध्या ऊसतोडणी सर्वत्र सुरू आहे. पूर्वी ऊस तोडणीसाठी नगर जिल्ह्यातील मजुरांचा तांडा येत होता. त्यानंतर बीड जिल्ह्यातील मजुरांची हुकूमशाही निर्माण झाली. त्यांच्या मुकादमांनी या भागातील बऱ्याच ऊस वाहतूक ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. याच व्यवहारामुळे बीड जिल्ह्यातील बहुतांशी कामगार या भागात फिरकत नाहीत. त्यामुळे स्थानिक मजुरांसह कर्नाटक भागातील कामगार ऊस तोडणीसाठी आले आहेत. परंतु हे कामगार तोडणीसाठी शेतकऱ्यांची लुबाडणूक करत आहेत. त्यातच इतर शेतीकामासाठी शेतमजूर मिळणे कठीण झाले आहे.
जागा, पैसे देऊन मजुरांना आपल्या शेतात कामावर नेण्याचे प्रकार सर्रास वाढले असून, यातून वादावादीचेही प्रकार घडत आहेत. याचाच फायदा सध्या शेतमजूर घेत असून, कमी वेळेत जास्त मोबदला मागण्यासाठी या मजुरांनी उरुण परिसरातील शेतकऱ्यांनी केलेल्या नियमावलीला विरोध दर्शवला आहे. यामुळे त्यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
शेतकरी आणि शेतमजूर हे एका गाडीची दोन चाके आहेत. शेतमालाला भाव आणि मजुरांना जादा हजेरी मिळण्यासाठी दोघांनी एकत्र येणे गरजेचे आहे. शेतमालाला दर मिळत नाही, परंतु त्यापासून होणाऱ्या पदार्थांच्या किमती अवाढव्य आहेत. उत्पादन कमी झाले तरीही शेतमजुरीचे दर कमी नाहीत.
-विश्वासराव पाटील, माजी उपाध्यक्ष, राजारामबापू पाटील कारखाना.
शेतमजुरांना किमान वेतन कायदा लागू आहे. शासनाने ठरवून दिलेल्या वेतनापेक्षा कमी वेतन देणे कायद्याने गुन्हा आहे. इस्लामपुरातील निनावी काढलेल्या दरपत्रकाची आपण रितसर चौकशी करू. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- नितीन पाटणकर, सहायक कामगार आयुक्त, सांगली
दरपत्रकामुळेच निर्माण झाला वाद
उरुण—इस्लामपूर परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नियमबाह्य शेतकामगारांची वेळ व दरपत्रक ठरविले आहे. पण हे कामगारांना मान्य नाही. त्यामुळे शेतकरी व कामगार वर्गात संघर्ष उफाळला आहे. इस्लामपूर येथे सोमवारी शेतकऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत शेतमजूर महिलांनी ठिय्या धरला होता.