आपली संस्कृती नसलेले साहित्य कुचकामीच
By admin | Published: November 2, 2014 12:37 AM2014-11-02T00:37:13+5:302014-11-02T00:39:52+5:30
नितीन सावंत : तुकोबाराय साहित्य परिषदेचा मेळावा उत्साहात
सांगली : विज्ञानाचा आधार नसलेल्या कल्पनाविलासात रमणाऱ्या साहित्याने देशाची माती केली. ज्या साहित्यात खेड्यापाड्यातली संस्कृती, आपल्या वेदना, वास्तव नाही, ते साहित्य कुचकामी आहे, असे मत जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रदेश महासचिव नितीन सावंत यांनी सांगलीतील मेळाव्यात व्यक्त केले.
जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्यावतीने साहित्यिकांचा व कार्यकर्त्यांचा मेळावा आज शनिवारी येथील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले की, आपली शिक्षणव्यवस्था पोपटपंची शिकविणारी आहे. शाळेत जे विज्ञान शिकवलं जातं, ते रुजवलं जात नाही. एका बाजूला भिंत निर्जिव असल्याचे सांगणारा अभ्यासक्रम दुसरीकडे ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे भिंत चालवत नेल्याचा पाठ शिकवितो. परस्परविरोधी शिक्षणपद्धतीने गोंधळ निर्माण केला आहे.
देशातील विद्रोही व वास्तववादी साहित्यिक वगळता अन्य सर्व साहित्यिकांनी देशाची माती केली. अश्लील, अवास्तव साहित्याची निर्मिती त्यांनी केली. त्यामुळे सध्याच्या काळात वास्तववादी साहित्यनिर्मिती करण्याची गरज आहे. चित्रपटातील संस्कृतीही श्रीमंतांची आहे. बारा बलुतेदारांची, शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याची, घरातील स्त्रीची, बालविश्वाची वास्तवाचे बोट धरून चालणारी संस्कृती साहित्य आणि चित्रपटात यायला हवी. शंभरपैकी ७५ साहित्यिक व्यसनाधीन आहेत. दारू पिल्याशिवाय त्यांची प्रतिभा बाहेर पडत नाही. जात्यावर गाणाऱ्या माईची प्रतिभा कोणत्याही व्यसनाशिवाय बाहेर पडते. त्यामुळे अशा व्यसनाधीन साहित्यिकांचीही ही पोकळ कारणे आहेत. संभाजी महाराज, जिजाऊ यांच्याबद्दल चुकीच्या गोष्टी मांडून तथाकथित साहित्यिकांनी निर्लज्जपणाचा कळस केला.
परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले. परिषदेचे विभागीय सचिव कपिल ढाके, राजेंद्र यादव, दत्तात्रय भोसले यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. शुभांगी पाटील, प्रा. विठ्ठल मोहिते, आर. एस. पवार, प्रा. दास मोरे, डॉ. मीनाक्षी साळुंखे, संतोष जाधव, अपर्णा खांडेकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)