साहित्य अनुभवलेल्या सौंदर्याचे प्रतीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:54 PM2019-01-15T23:54:40+5:302019-01-15T23:54:45+5:30
अंकलखोप : नवोदित कविंना कविता कशी करावी, याचे भान नाही. कविता ही कलाकृती आहे, याची जाणीव नाही. कारण सध्याचे ...
अंकलखोप : नवोदित कविंना कविता कशी करावी, याचे भान नाही. कविता ही कलाकृती आहे, याची जाणीव नाही. कारण सध्याचे कवी, लेखक यांचे वाचन कमी आहे. ते साहित्याच्या अनुभवापासून दूर आहेत. साहित्य हे जीवनाचे प्रतिबिंब नसते, तर ते अनुभवलेल्या सौंदर्याचे प्रतीक असते, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. प्रभा गणोरकर यांनी केले. औदुंबर येथे सदानंद साहित्य मंडळाच्या ७६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या.
गणोरकर पुढे म्हणाल्या, ७६ वर्षांपूर्वी बा. सी. मर्ढेकर यांनी साहित्याला एक वेगळी कलाटणी दिली. वाङ्मयाला श्रेष्ठत्व निर्माण करून दिले. त्यांच्या साहित्यात नवीन विश्व आले. त्यांनी सगळे संकेत तोडून टाकणारी कविता निर्माण केली. दुर्लक्षित असणारा माणूस समोर आणला. मर्ढेकरांची उंची आजपर्यंत कोणत्याही साहित्यिकाला गाठता आली नाही. त्यांनी साहित्यावर संस्कार केला. त्यांच्या जीवन दर्शनाच्या भूमिकेचा पुढच्या ५० वर्षांच्या काळात प्रभाव पडला आहे. ६० च्या दशकात लिहिणारी पिढी ही अस्तित्ववादी होती. ती आताच्या ९० च्या दशकात दिसत नाही.
त्या पुढे म्हणाल्या, सध्याच्या चंगळवादामुळे वाचन संस्कृती लयाला गेली आहे. प्रत्येक काळात नव्या चळवळी येत असतात; मात्र वाचन चळवळीची संस्कृती पुढे येत नाही.
साहित्य संमेलनाच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त संमेलनात ‘सौरभ’ स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. श्रीनिवास कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी अध्यक्षांचा परिचय करून दिला. वासुदेव जोशी यांनी सूत्रसंचालन केले. पुरुषोत्तम जोशी यांनी आभार मानले.
टीकात्मक विवेचन...
गणोरकर म्हणाल्या, कुटुंब संस्था आता नाहीशी झाली आहे. त्याचबरोबर विवाह संस्था हा लग्नाचा बाजार झाला आहे. नव्या साहित्यामध्ये वाचकांच्या मनात भ्रम निर्माण होत आहे. वाङ्मयात निर्मितीकाराला लोकांची एक भूमिका असते. ती व्यक्त व्हायला हवी असते. परंतु ती नवीन साहित्यिकांकडे नाही. सध्याच्या काळातील कविता लोक वाचत नाहीत.